बेळगाव : निलजी येथील मराठी शाळेचा शतक महोत्सव कार्यक्रम थाटात झाला. यातून निलजीवासीयांचे मराठीप्रेम अधोरेखित झाले. हा कार्यक्रम रविवारी (दि. 12) रामदेव गल्ली येथील कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज सभामंडपात थाटात झाला. कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने राहुल गिरी यांची उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानी ॲड. लक्ष्मण पाटील होते. व्यासपीठावर खासदार जगदीश शेट्टर, शिवराज जाधव, मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे, चंद्रकांत पाटील, लक्ष्मीबाई पाटील, माजी आमदार संजय पाटील, माजी महापौर मालोजी अष्टेकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, डॉ. अमर पाटील, तालुका म. ए. समिती कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, किशोर गोमाण्णाचे, रामचंद्र मोदगेकर, शशिकला जाधव, अंकुश केसरकर यांच्यासह माजी शिक्षक उपस्थित होते.
प्रारंभी लक्ष्मीबाई पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रज सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलन व रोपाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्राचे युवा वक्ते राहुल गिरी म्हणाले, की प्रत्येकासाठी शाळा ही खऱ्या अर्थाने दुसरी जननी आहे. मराठी शाळा व मराठी भाषेवरील तुमची निष्ठा, प्रेम व एकी पाहून मी भारावून गेलो आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात इंग्रजी शाळांच्या रेट्यात आपल्या शाळेचा स्थर उंचावण्यासाठी तिचे जतन करण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून प्रत्येक माजी विद्यार्थी मराठी भाषाप्रेमींनी शाळेला देऊ केलेली मदत पाहून सुखावून गेलो आहे.
रामचंद्र मोदगेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यांनी शाळेच्या 100 वर्षांचा प्रवास उलगडला. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रमाकांत कोंडुसकर, मालोजी अष्टेकर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सी. वाय. पाटील यांनी केले.
सायंकाळी 5 वा. सांस्कृतिक कार्यक्रम झाले. तसेच आजी-माजी शिक्षक व देणगीदारांचा सत्कार समारंभ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रू पाटील होते. उद्घाटकम्हणून माजी ग्रा. पं. सदस्य वसंत पाटील उपस्थित होते. यावेळी लक्ष्मण गोमाण्णाचे, गंगाराम मोदगेकर, शामराव पाटील, रमेश मोदगेकर, विठ्ठल पाटील, सतीश धनुटकर, नागेश देसाई, सी. के. पाटील, मनोहर पाटील, जयराज मोदगेकर, कृष्णा पाटील, विष्णू पाटील, मल्लाप्पा पाटील, भावकाण्णा पाटील, दीपक केतकर, शंकर मेणसे, निखिल मोदगेकर, सुनील पाटील, गोविंद मोदगेकर, राधिका पाटील यांच्यासह मान्यवर, शतक महोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.