Pudhari File Photo
बेळगाव

बेळगाव : महापौर निवडणुकीसाठी नवा प्रस्ताव

दोघांचे सदस्यत्व रद्द झाल्याने 63 जणांना मतदानाचा अधिकार

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : भाजपचे मंगेश पवार आणि जयंत जाधव यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे बर्‍याच घडामोडी घडत आहेत. महापालिकेने आता महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी या दोघांची नावे कमी करुन नवीन प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे, महापौर, उपमहापौर निवडणुकीत आता 65 ऐवजी 63 जणांना मतदानाचा अधिकार असणार आहे.

गोवावेस येथील खाऊकट्ट्यात आपल्या पत्नींच्या नावाने गाळे घेतल्यामुळे नगसेवक पवार व जाधव यांच्याविरोधात प्रादेशिक आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्टेण्णावर यांनी सोमवारी (दि. 10) निकाल देताना पवार आणि जाधव यांचे सदस्यत्व रद्द केले. त्यामुळे, महापालिका सभागृहात नगरसेवकांची संख्या दोनने कमी झाली आहे.

महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वीच प्रस्ताव पाठविला होता. विद्यमान महापौर, उपमहापौरांचा कार्यकाळ 14 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्यामुळे, महापालिकेच्या कौन्सिल विभागाने तयारी सुरु केली होती. प्रादेशिक आयुक्तांकडून वेळापत्रक आल्यानंतर प्रत्यक्ष तयारीला वेग येणार आहे. दरम्यान प्रादेशिक आयुक्तांनी दोघांचे सदस्यत्व रद्द केल्यामुळे मतदानाचा अधिकार असलेल्या सदस्यांच्या संख्येत बदल झाला आहे.

महापालिकेत एकूण 58 नगरसेवक आहेत. त्यापैकी दोघांचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे ही संख्या 56 वर पोचली आहे. जगदीश शेट्टर, प्रियांका जारकिहोळी हे दोन खासदार, सतीश जारकिहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, अभय पाटील आणि राजू सेट हे चार आमदार आणि साबण्णा तळवार हे विधान परिषद सदस्य यांना मतदानाचा अधिकार आहे. आता एकूण मतदारांची संख्या 63 वर पोचली आहे. तसा नवा प्रस्ताव महापालिकेकडून प्रादेशिक आयुक्तांना पाठवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT