बेळगाव : मालमत्तेच्या वादातून पुतण्यानेच काकाचा जांबियाने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील पाटील मळा येथे बुधवारी (दि. 26) रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. अनिल शरद धामणेकर (वय 46, रा. पाटील मळा, बेळगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुतण्या आदित्य दीपक धामणेकर (वय 21) याला अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, मयत अनिल व संशयित आदित्य यांच्यात गेल्या काही वर्षांपासून मालमत्तेच्या वाटणीवरून वाद सुरू आहे. यावरूनच बुधवारी रात्री अनिल व आदित्य यांच्यात वादावादी सुरू झाली. अखेरीस आदित्यने रागाच्या भरात काका अनिल यांच्या पोटावरच जांबियाने वार केले. यामुळे ते जागीच कोसळले.या घटनेनंतर पाटील मळा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा रुग्णालयासमोरही मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी पाटीलमळ्यात धाव घेऊन संशयित आदित्यला ताब्यात घेतले. पोलिस उपायुक्त रोहन जगदीश, खडेबाजार विभागाचे एसीपी शेखराप्पा एच. यांनी घटनास्थळी भेट दिली. खडेबाजार पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल गाबी व त्यांच्या सहकार्यांनी पंचनामा केला. याप्रकरणी मृताची पत्नी स्वाती धामणेकर यांनी फिर्याद दिली आहे.
अनिल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. गुरुवारी (दि. 27) सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी दीडच्या सुमारास सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.