नीट घोटाळ्याचे धागेदोरे बेळगावपर्यंत  pudhari photo
बेळगाव

नीट घोटाळ्याचे धागेदोरे बेळगावपर्यंत

गुजरात पोलिसांकडून पाचजणांना अटक ः बेळगावच्या समन्वयकाचाही समावेश

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव ः वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी महत्वपूर्ण असलेल्या नीट घोटाळाप्रकरणी गुजरातमधील राजकोट पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. त्यात बेळगावातील मनजीत नामक व्यक्तीचे नाव समोर आल्याने नीट घोटाळ्याचे धागेदोरे बेळगावपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शुक्रवारी (दि. 9) राजकोटमधील गुन्हे अन्वेषण विभागाने नीटमध्ये गुण वाढवून देणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला. त्यात शिक्षण सल्लागार विपुल तेरैया, राजकोटमधील रॉयल अ‍ॅकॅडमी या कोचिंग क्लासचा संचालक राजेश पेठाणी, सुरतमध्ये शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र चालवणारा व तेरैय्याचा भाऊ प्रकाश, बेळगावात सीबीएसई परीक्षा समन्वयक म्हणून काम करणारा मनजीत व उदयपूरमधील धवल संघवी यांचा समावेश आहे.

वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी नीट महत्वाची आहे. परंतु, उपरोक्त टोळीकडून 15 ते 20 लाख रुपये घेऊन नीटच्या गुणात फेरफार करुन ते वाढवून देण्यात येत होते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडून असा प्रकार सुरु असल्याची माहिती राजकोटच्या गुन्हे शाखेचे डीसीपी डॉ. पार्थराजसिंग गोहिल यांनी दिली आहे.

बेळगावातून प्रारंभ

विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम घेऊन नीटच्या गुणांमध्ये फेरफार करण्याची सुरवात बेळगावमधून झाल्याचे तेथील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे मनजीत व विपुल तेरैया हे दोघे या घोटाळ्यामागील मास्टरमाईंड आहेत. अशा प्रकारे या टोळीने तब्बल 30 विद्यार्थ्यांकडून रक्कम वसूल करुन त्यांना नीटमध्ये वाढीव गुण देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी फक्त गुजरातमध्येच नव्हे तर महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, दिल्ली, राजस्थानमधील तरुणांनाही गंडा घातला आहे. कर्नाटकातील किती तरुण यामध्ये अडकले आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी कर्नाटकसह बेळगावातील तरुणही आमिषाला बळी पडल्याचा संशय आहे.

अन् सर्व घोटाळा उघडकीस

राजकोट जिल्ह्यातील जेटपूरमधील तुषार वेकारिया नामक व्यक्तीने 5 मे रोजी पोलिसांत फिर्याद दाखल केली. आपल्या मुलाला नीटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवत 30 लाख रुपये घेतले. परंतु, त्यांनी गुण वाढवून दिले नसल्याची ही तक्रार होती. त्यानंतर याचा सखोल तपास सुरु झाला व ही सोनेरी टोळी गजाआड झाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या टोळीने 30 जणांकडून रक्कम उकळल्याची माहिती मिळाली आहे. परंतु, ही संख्या यापेक्षाही अधिक असल्याचा संशय आहे. काही तरुणांची जबानी घेतली असून फसलेल्या तरुणांनी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

परीक्षा मंडळाची मदत घेणार

रक्कम घेऊन कोणाचे नीटमधील गुण वाढवले आहेत का, या दिशेनेही आमचा तपास सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांकडून यांनी रक्कम उकळली आहे, त्यांची यादी बनवून संबंधित परीक्षा मंडळाकडे पाठवली जाणार आहे. यामध्ये सदर विद्यार्थ्याला वाढीव गुण दिले आहेत की नाही, हे स्पष्ट होणार आहे, डीसीपी डॉ. गोहिल यांनी स्पष्ट केले आहे.

बेळगावातून किती बोगस विद्यार्थी

नीट घोटाळ्याची चर्चा होते तेव्हा बेळगावचे नाव हमखास चर्चेत येते. तीन वर्षांपूर्वी बेळगावातील विजयनगर व विनायकनगर परिसरात क्लासेस चालवणार्‍या एका व्यक्तीने मोठी रक्कम घेऊन काहीजणांचे नीटमध्ये गुण वाढवून दिल्याची चर्चा तेव्हा झाली होती. दबक्या आवाजात झालेली ही चर्चा अखेरपर्यंत चर्चाच राहिली. परंतु, तेव्हा काही विद्यार्थ्यांनी रक्कम देऊन नीटमध्ये अधिक गुण घेऊन एमबीबीएसला प्रवेश घेतल्याची चर्चा आजही होते. असे किती बोगस विद्यार्थी बेळगाव शहर व जिल्ह्यात आहेत, याचीही सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

याआधीही नीट घोटाळा बेळगावातून

गतवर्षीही नीट घोटाळ्यात बेळगावचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी आरागोंड अरविंद प्रकाशम (वय 47, रा. कोंडकल, मोकीला जि. संगनरेड्डी, आंध्रप्रदेश) याला अटक केली होती. त्याने बेळगाव, बंगळूरसह कर्नाटकातील अन्य जिल्ह्यात तसेच आंध्र, तामिळनाडू, दिल्लीसह काही ठिकाणच्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये गुण वाढवून देण्याचे आमिष दाखवत रक्कम उकळली होती. याबाबतची तक्रार तेव्हा मार्केट पोलिसांत झाली होती. मार्केटचे निरीक्षक महांतेश धामण्णवर यांनी याचा सखोल तपास करीत आंध्रातून संशयिताला ताब्यात घेतले होते. संपूर्ण देशभर हा घोटाळा असल्याने त्याची पुढील चौकशी रखडल्याचे सांगण्यात येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT