बेळगाव : प्राथमिक स्तरावरील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने, राज्य सरकार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेची (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तके पहिली इयत्तेपासून स्वीकारण्याचा विचार करत आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या मुख्य सचिवांनी अलीकडेच शिक्षण विभागाच्या अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे.
राज्यात नली-कली योजना योग्यरित्या काम करत नाही. ती रद्द करून सरकारी, अनुदानित आणि खासगी शाळांसह सर्व शाळांमध्ये राज्य अभ्यासक्रम लागू करण्याबाबत सरकारी पातळीवर चर्चा सुरू आहे. लवकरच अंतिम आदेश जारी केला जाणार आहे. सहावी ते बारावीपर्यंत एनसीईआरटी गणित आणि विज्ञानाची पुस्तके वापरली जात आहेत.
केंद्रीय अभ्यासक्रमाच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळांमध्ये एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके शिकवली जात आहेत. राज्य अभ्यासक्रमाच्या तुलनेत, एनईआरटीची पाठ्यपुस्तके ही एक अद्ययावत आवृत्ती आहे. सीबीएसई आणि आयसीएसईचे विद्यार्थी दुसर्या पीयूसी विज्ञान विभाग, सीईटी, नीट जीईई आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वाधिक यश मिळवत आहेत.
नागरी सेवा परीक्षा, बँकिंग, रेल्वे आणि इतर भरती परीक्षांमध्ये एनसीईआरटी अभ्यासक्रमावर आधारित मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या हितासाठी, पहिलीपासूनच एनसीईआरटी अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्याचा विचार सुरू आहे.
नली-कली ही योजना सरकारी प्राथमिक शाळांमध्ये पहिली, दुसरी आणि तिसरी इयत्तेच्या मुलांना शिकविली जाते. सरकारने फक्त सरकारी शाळांमध्ये नली-कली लागू केली आहे. शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधींनी ही योजना बंद करण्याची मागणी केली आहे. सरकार यावरही गांभीर्याने विचार करत आहे.
मुलांच्या शिक्षणाच्या द़ृष्टीने पहिल्या इयत्तेपासूनच एनसीईआरटी अभ्यासक्रम स्वीकारण्याबाबत विचार सुरू आहे. याबाबत अधिकार्यांबरोब बैठक घेण्यात आली आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.डॉ. के. व्ही. श्रीलोकचंद्र, शाळा शिक्षण आयुक्त