बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना, बेळगाव स्पोर्ट्स क्लब, रोटरी क्लब ऑफ बेळगाव आणि सतीश जारकीहोळी फाऊंडेशन पुरस्कृत 14 ते 16 जानेवारी दरम्यान होणार्या राष्ट्रीय स्तरावरील पुरुष व महिलांच्या स्पर्धेसाठी देशभरातील 500 हून अधिक शरीरसौष्ठवपट्टू मंगळवारी बेळगावात दाखल झाले आहेत. या स्पर्धेत एकूण 25 लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
मंगळवारी ( दि.14) सकाळपासून अंगडी कॉलेज येथील योगा सभागृहात नावनोंदणी व स्पर्धकांची वजने घेण्याची लगबग सुरु होती. दिवसभर विविध राज्यातील 500 शरीरसौष्ठवपट्टूंनी नावनोंदणी केली. इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे अध्यक्ष स्वामी रमेशकुमार, सचिव हिरल सेट, भारतातील पहिले मि. युनिव्हर्स पद्मश्री प्रेमचंद डिग्रा, अर्जुन पुरस्कार विजेते टी. व्ही. पॉली, भास्करन, बॉबी सिंग, नवनीतसिंग, बेळगावात दाखल झाले आहेत. स्पर्धेसाठी 200 पंचही दाखल झाले आहेत. बुधवारी ( दि.15 ) सर्व वजनी गटातील खेळाडूंची चाचणी होणार आहे. 16 रोजी पुरुष शरीरसौष्ठव स्पर्धेची मुख्य स्पर्धा तसेच महिलांची स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत किताब विजेत्याला तीन लाख रुपये, उपविजेत्याला एक लाख तर बेस्ट पोझरला 25 हजार रुपये दिले जाणार आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रुपये 50 हजार, 40 हजार, 30 हजार, 25 हजार व 20 हजार दिले जाणार आहेत.