बंगळूर : म्हैसूर येथे कावेरी नदीत बुडून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दि. 19 रोजी घडली. म्हैसूर येथील कृष्णराजनगर येथील दर्ग्याचा उरूस असल्याने 8 जण आले होते. दरम्यान, अर्केश्वर मंदिराजवळ आंघोळीसाठी ते नदी पात्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने 6 जण बुडाले. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार म्हैसूर जिल्ह्यातील कृष्णराजनगर येथील दर्ग्यात उरूस असल्याने रविवारी बंगळूर, उटीसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने जमले होते. दरम्यान, काहीजण अर्केश्वर मंदिराजवळील नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले होते. यावेळी नदीच्या प्रवाह व पाण्याचा अंदाज न आल्याने 6 जणांचा बुडून मृत्यू झाला.
बंगळूर येथील यासिन (वय 23), हैमा (वय 13), उटी येथील फातिमा (वय 38), म्हैसूर येथील नेहा (वय 20), उमेर (वय 7) व अफिया (वय 20) अशी मृतांची नावे आहेत. मृतदेह बाहेर काढून म्हैसूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.