बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : दारू प्यायला बसल्यानंतर त्याचे पैसे कोणी द्यायचे, या क्षुल्लक कारणावरून येळ्ळूर येथील सेंट्रिंग कामगार तरुणाचा अनगोळ येथे खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मृताच्या सेंट्रिंग कामगार मित्राला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर करून कारागृहात रवानगी केली.
15 जून रोजी अनगोळ येथील तलाव परिसरातील शेतवडीत संजू तुकाराम पाटील (वय 34, रा. इंदिरा कॉलनी, येळ्ळूर) या तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. टिळकवाडीचे निरीक्षक दयानंद शेगुणशी यांनी याचा तपास केला.
सेंट्रिंग काम करणारे चौघे मित्र नेहमीच पार्टीला बसत होते. ज्या दिवशी संजूचा खून झाला त्या दिवशी त्याचा एक मित्र व संजू दोघेच येथे प्यायला बसले होते. दोघांनीही सोबत नेलेली दारू प्यायली. यानंतर यापूर्वी दारूचे पैसे मी दिले होते. आता पण मलाच द्यायला लावतोस, यातून भांडण सुरू झाले.
हे भांडण वाढत जाऊन मित्राने नशेत सोबत नेलेल्या कोयत्याने संजूच्या डोकीत वार केले. हा वार वर्मी बसल्याने संजू निपचीत पडला. घाबरलेला मित्र येथून निघून गेला. रक्तस्त्राव होऊन संजूचा मृत्यू झाल्याचे दुसर्या दिवशी दिसून आले. याचा तपास करत पोलिसांनी एकाला अटक करून कारागृहात रवानगी केली.