बेळगाव ः एमआरपीपेक्षा वाढीव दराने लॅपटॉप खरेदी करण्यास त्यात सुमार दर्जाचे सॉफ्टवेअर अपलोड केल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत होत आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असताना डीसीआरई (नागरी हक्क अंमलबजावणी संचलनालय) पोलिसांनी लॅपटॉपमध्ये चांगल्या दर्जाचे आणि योग्य सॉफ्टवेअर अपलोड केले आहे, अशी क्लिनचीट दिली आहे. त्यामुळे, कारवाईची टांगती तलवार असलेल्या महापालिका अधिकार्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
महापालिकेच्या अनुदानातून एमबीबीएस आणि अभियांत्रिकी शिक्षण घेणार्या अनुसुचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी आर्थिक मदत करण्यात येते. यंदा 123 विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीऐवजी थेट लॅपटॉप वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समितीने हा आदेश दिला होता. पण, त्यासाठी नियमबाह्यरित्या ठेका देण्यात आला. ठेकेदाराने लॅपटॉप खरेदी करुन ते महापालिकेला दिले. पण, या लॅपटॉपसाठी एमआरपीपेक्षा अधिक रकमेचे बिल महापालिकेने ठेकेदाराला चुकविले आहे.
हे प्रकरण चव्हाट्यावर आले असतानाच लॅपटॉपमध्ये प्री लोडेड विंडो 11 प्रो लायसन्स हे सॉफ्टवेअर अपलोड होणे आवश्यक होते. पण, लॅॅपटॉपमध्ये क्रॅक वर्जन सॉफ्टवेअर लोड करण्यात आले. त्यामुळे, दर आणखी कमी झाला असून लॅपटॉपचा दर्जा सुमार असल्याचा आरोप करण्यात आला होता.
याप्रकरणी लक्ष्मण दशरथ कोलकार यांनी डीसीआरई पोलिसांकडे तक्रार दिली होती. डीसीआरई पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली. त्यामध्ये ठेकेदार राजेशकुमार चौगुले यांनी लॅपटॉप खरेदी करताना एचपी कंपनीने विंडो 11 प्रो लायसन्स हे सॉफ्टवेअर लोड केले आहे. त्याची त्रयस्थांकडून खातरजमा झाली असून त्यांचे पत्रही आहे, असे सांगितले. तर एचपी कंपनीनेही लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर अपलोड करण्यात आले आहे, असे इमेलद्वारे कळवले आहे. त्यामुळे, पोलिसांनी या प्रकरणात ठेकेदाराला क्लिन चीट दिली आहे.
सॉफ्टवेअर प्रकरणात ठेकेदाराला क्लिनचीट मिळाली असली तरी लॅपटॉप खरेदी प्रकरण कायम आहे. त्याची आयुक्त शुभा बी. यांच्या आदेशानुसार लेखाधिकारी चौकशी करत आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणी नगरसेवक शंकर पाटील काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.
लॅपटॉप खरेदी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता लोकायुक्तांचे दरवाजे ठोठावण्याची तयारी सुरु झाली आहे. या प्रकरणात अधिकारी सहभागी असून लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे, हे प्रकरण सर्वसाधारण सभेतही गाजण्याची शक्यता आहे.