cyber crime Pudhari
बेळगाव

Belgaum cyber crime case: शोधू मी... कुठे, कसे भामट्या तुला?

साडेपंधरा कोटी रक्कम 390 बँक खात्यांवर वर्ग : पोलिसांसमोर शोधण्याचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : दहा दिवसांपूर्वी बेळगावात एका 81 वर्षीय वृद्धाची तब्बल 15 कोटी 46 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी ही रक्कम कोणत्या बँक खात्यावर गेली आहे, याचा तपास सुरु केला असता ती तब्बल 390 बँक खात्यांवर वर्ग झाल्याचे उघडकीस आले. हे पाहून पोलिसांनाही धक्का बसला असून आता ही 390 बँक खाती कशी व कुठून शोधून काढायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.

इतर सर्व बेकायदेशीर धंद्यांमध्ये आजकाल फसवणूक करणाऱ्यांना सर्वात सोपा धंदा हा ऑनलाईन फसवणुकीचा बनला आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बसायचे व तेथून फोन करायचा. समोरच्याला लॉटरी, कार, बक्षीस असे आमिष दाखवायचे. एखाद्याला पोलिस असल्याचे सांगत डिजिटल अरेस्टची भिती घालायची व तो जेथे असेल तेथून आपल्या बँक खात्यावर हजारो लाखो नव्हे तर कोट्यवधींची रक्कम वर्ग करून घ्यायची. फसणारा फक्त एकाच दिवसात फसलेला नसतो तर त्याची फसवणूक किमान दोन महिने चाललेली असते.

आधी 10 हजार मग 1 लाख त्यानंतर दोन, पाच, दहा, पंधरा लाख अशी थोडीथोडी रक्कम काढून घेतली जाते. आधी गेलेली रक्कम परत येईल, या आशेने समोरची व्यक्ती भामट्याला रक्कम देत जाते आणि भामटा आणखी मागत जातो. त्यामुळे, दीड-दोन महिन्यांनी आपली रक्कम गेली याचा साक्षात्कार फसणाऱ्याला होतो मग तो सीईएन पोलीस ठाणे गाठतो. मार्च 2026 मध्ये दाखल झालेली बहुतांश फसवणुकीची प्रकरणे ही नोव्हेंबर 2025 पासूनची आहेत, यावरुन हे स्पष्ट होते. त्यामुळे, भामट्यांना समोरच्याकडून काढून घेतलेल्या रकमेची व्यवस्थित विल्हेवाट लावण्यास पुरेसा वेळ मिळतो आणि फसवणुकीची रक्कम परत मिळणे दुरापास्त होऊन बसते.

दहा दिवसांपूर्वी बेळगावात एका वृद्धाची तब्बल 15 कोटी 46 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. तब्बल एक महिना त्याच्या बँक खात्यावरुन रक्कम काढून घेणे सुरु होते. परंतु, त्या काळात सदर वृद्धाने याबाबत कुणाशीही चर्चा केली नाही. त्यामुळे, भामट्यांनी त्याची सर्व रक्कम काढून घेत अन्य खात्यांवर वर्ग केली. रक्कम कोटीच्या घरात असल्याने पोलिस खात्याने हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरु केला. परंतु, हा तपास करताना पोलिसांनाच चक्कर येण्याची वेळ आली. कारण, ही रक्कम एक-दोन नव्हे तर तब्बल 390 बँक खात्यांवर वर्ग करुन घेतल्याचे स्पष्ट झाले. ती तीन ते चार लाखापासून 50 लाखापर्यंत असल्याचेही समोर येत आहे. भामट्यांनी ती व्यवस्थित सगळीकडे वर्ग करत उद्या चौकशी झाली तरीही ती सापडू नये, याची पुरेपूर व्यवस्था केल्याचे दिसून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT