बेळगाव : दिव्यांगांनी खचून जाउ नये. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील प्रत्येक गावातील दिव्यांग व्यक्तींपर्यंत सरकारी सुविधा पोचविण्याचे काम केले जाईल, असे खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी सांगितले. चिकोडी शहरातील परटी नागलिंगेश्वर सभागृहात चिकोडी लोकसभा मतदारसंघातील दिव्यांगांना साहित्य वितरण व शाळांना स्मार्ट बोर्ड वाटप करून त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, दिव्यांग राघवेंद्र अणवेकर यांनी अपंगत्वावर मात करून जलतरण स्पर्धेत यश मिळविले आहे. दिव्यांगांनी त्यांचा आदर्श घ्यावा. आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, दिव्यांग, महिला, शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्व योजना पोहोचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. यापुढील काळातदेखील सर्वसामान्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील.
महावीर मोहिते, दिव्यांग जलतरणपटू राघवेंद्र अणवेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. खा. जारकीहोळी यांच्याकडून मतदारसंघातील दिव्यांग लोकांना तिचाकी, श्रवण यंत्र, वॉटर बेड व शाळांना स्मार्ट बोर्डचे वाटप करण्यात आले. यात ३५ वॉटर बेड, व्हीलचेअर २५, श्रवण यंत्र ३० व १८ तिचाकी व १० टॅबचा समावेश आहे.
बुडाध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी स्वागत केले. कार्यक्रमास सुप्रिया पाटील, प्रभाकर कोरे, इरफान बेपारी, अर्जुन नाईकवाडी, निर्मला पाटील, गटशिक्षणाधिकारी प्रभावती पाटील, चेतन कुमार, एच. एस. नसलापुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.