Mother's Day  Pudhari
बेळगाव

Mother’s Day | आई : आयुष्याच्या प्रत्येक वळणावरील निःशब्द शक्‍ती

मानवी जीवनातील सर्वात पवित्र, नि:स्वार्थ आणि शाश्वत नाते कोणते असेल, तर ते आईचे

पुढारी वृत्तसेवा
विठ्ठल नाईक

चिकोडी : मानवी जीवनातील सर्वात पवित्र, नि:स्वार्थ आणि शाश्वत नाते कोणते असेल, तर ते आईचे. आई ही केवळ जन्मदात्री नसते, तर ती मुलांच्या आयुष्याचा पाया घडवणारी पहिली गुरू, संघर्षात धैर्य देणारी प्रेरणा आणि अपयशातही न ढळणारा विश्वास असते. म्हणूनच मातृदिन हा केवळ औपचारिक शुभेच्छांचा दिवस नसून आईच्या अथांग प्रेमाची आणि तिच्या त्यागाची जाणीव करून देणारा भावनिक दिवस आहे. आई ही आयुष्याच्या प्रत्येक वळणावरील निःशब्द शक्‍ती आहे.

आईचे व्यक्‍तिमत्त्व हे समुद्रासारखे विशाल असते. ती स्वतःच्या वेदना लपवून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत असते. मुलांच्या भविष्यासाठी ती स्वतःच्या इच्छा, आकांक्षा आणि आराम यांचा सहज त्याग करते. म्हणूनच जगातील कोणतेही नाते आईच्या प्रेमाशी तुलना करू शकत नाही.

आधुनिक आणि वेगवान जीवनशैलीत तंत्रज्ञानाने माणसांना जवळ आणले असले तरी मनांमधील अंतर वाढत असल्याचे दिसते. कुटुंब व्यवस्था बदलत आहे. संयुक्त कुटुंबांची जागा आता विभक्‍त कुटुंबांनी घेतली आहे. करिअर, पैसा आणि स्पर्धेच्या शर्यतीत अनेकदा आई-वडिलांकडे दुर्लक्ष होताना दिसते. वृद्धाश्रमांची वाढती संख्या ही समाजाच्या बदलत्या मानसिकतेची वेदनादायी जाणीव करून देते. ज्या आईने मुलांसाठी आयुष्य झिजवले, तिच्याच वाट्याला वृद्धापकाळात एकटेपण येणे, ही समाजासाठी चिंतेची बाब आहे. मातृदिन साजरा करताना अनेकजण सोशल मीडियावर मोठमोठे संदेश लिहितात, छायाचित्रे शेअर करतात, भेटवस्तू देतात.

पण आईला खऱ्याअर्थाने गरज असते ती प्रेमाच्या दोन शब्दांची, आदराची आणि आपल्या सहवासाची. तिच्यासोबत काही क्षण मनमोकळेपणाने बोलणे, तिच्या आरोग्याची काळजी घेणे, तिच्या भावना समजून घेणे आणि तिला मानसिक आधार देणे, हेच तिच्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट ठरते.

भारतीय संस्कृतीत आईला देवत्वाचे स्थान देण्यात आले आहे. 'मातृदेवो भव' ही शिकवण केवळ शब्द नसून ती आपल्या संस्कृतीची जीवनमूल्ये आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्‍तिमत्त्वामागे जिजाऊंचे संस्कार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांच्यासारख्या महान व्यक्‍तींच्या आयुष्यात त्यांच्या मातांनी दिलेले संस्कार अत्यंत महत्त्वाचे ठरले. समाज घडवायचा असेल, तर प्रथम मातेला सन्मान द्यावा लागेल, हे यावरून स्पष्ट होते.

आई ही घरातील आनंदाचा केंद्रबिंदू असते. तिच्या मायेच्या सावलीतच कुटुंबाला सुरक्षिततेची जाणीव मिळते. संकट कोणतेही असो, आई आपल्या मुलांसाठी खंबीरपणे उभी असते. म्हणूनच मातृदिन हा केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता, प्रत्येक दिवस आईप्रती कृतज्ञता व्यक्‍त करणारा असावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT