खानापूर : गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धूळ खात असलेले विश्वेश्वरय्या विज्ञान उद्यान. Pudhari File Photo
बेळगाव

खानापूरचा शैक्षणिक डोलारा डळमळीत

गटशिक्षणाधिकारी कार्यालयात गैरसोयीच अधिक : शिक्षकांवरील वचकही कमी

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या खानापूर तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून चांगले बदल दिसण्यास सुरुवात झाली होती. शिक्षक प्रयोगशील झाले होते. तंत्रस्नेही शिक्षणाची कास त्यांनी धरली होती. पण, गेल्या दोन वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्राची पूरती वाताहत झाली आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयात तर सोयींपेक्षा गैरसोयच अधिक झाल्याने नव्या वर्षात येणार्‍या नव्या गटशिक्षणाधिकार्‍यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

गटशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांची कारकीर्द विविध कारणांनी वादग्रस्त राहिली आहे. वर्षभरापूर्वी चक्क दोन गट शिक्षणाधिकार्‍यांनी स्वतंत्ररीत्या दोन खुर्च्या टाकून आपणच या पदाचे खरे दावेदार असल्याचे सांगितले होते. अखेरीस कुडची यांचीच नियुक्ती कायम झाल्याने त्यांचा खानापुरातील मुक्काम वाढला होता. सध्य परिस्थितीत शिक्षणाचा दर्जा खालावण्यास गटशिक्षणाधिकार्‍यांचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. शिक्षकांसह कार्यालयीन कर्मचार्‍यांवर त्यांचे कसलेच नियंत्रण नसल्याने बेबंदशाही वाढली आहे. गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे सभ्य शिक्षकांनी कार्यालयात जाणेच बंद केले आहे. सध्याच्या गटशिक्षणाधिकारी कुडची या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाल्या. त्यामुळे नववर्षात तरी तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात नवीन आणि भरीव घडण्यासाठी जबाबदारीला न्याय देणारे शिक्षणाधिकारी येतील अशी शिक्षकांसह शिक्षण प्रेमींना आशा आहे.

गेल्या दहावी परीक्षेत निकालात बेळगाव जिल्ह्यात खानापूर तालुका शेवटच्या स्थानावर राहिला आहे. यावरून ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेचे मोजमाप करता येऊ शकते. गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील सर्वच विभागांमध्ये ’वजन’ ठेवल्याशिवाय काम होणे दुरापास्त झाल्याने कार्यालयाची पायरी चढताना शिक्षक दहादा विचार करतात. कार्यालयाचा संपूर्ण कारभार शिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या एका स्वयंघोषित अधिकार्‍याच्या इशार्‍यावर चालतो. या अधिकार्‍याच्या पसंतीचाच अधिकारी तालुक्यात गटशिक्षणाधिकारी म्हणून येतो. परिणामी हा अधिकारी म्हणेल त्यानुसार गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील पान हलते. त्याकरिता नवीन वर्षात नव्या अधिकार्‍यांनी अशा चमकोगिरी करणार्‍या शिक्षकांना कार्यालयापासून लांब ठेवावे तरच शिक्षण क्षेत्राचा उद्धार शक्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

दिव्याखाली अंधार !

2022 मध्ये तत्कालीन गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण यकुंडी यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या सहकार्याने गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या आवारात सर एम. विश्वेश्वरय्या विज्ञान उद्यानाची उभारणी केली होती. त्याचीही देखरेख व व्यवस्था ठेवण्यात आलेली नाही. लाखो रुपये खर्चून उभारलेले विज्ञान उद्यान सध्या धुळखात पडून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT