Monsoon Arrival 2026 | मान्सून १४ दिवस विलंबाने बेळगावात Pudhari Photo
बेळगाव

Monsoon Arrival 2026 | मान्सून १४ दिवस विलंबाने बेळगावात

हलक्या सरी; मृग नक्षत्र गेले कोरडे, आर्द्राकडून अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : कडक उन्हाने होरपळून निघत असलेल्या बेळगावला मंगळवारी काहीसा दिलासा मिळाला तो मान्सून वाऱ्यांमुळे कोसळलेल्या सरींमुळे. चौदा दिवसांच्या विलंबाने मान्सूनचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. दुपारनंतर पावसाची रिमझिम सुरू झाल्‍यानंतर हवेत गारठा निर्माण झाला होता. पावसाचा जोर नसला तरी पावसाळी वातावरणामुळे रेनकोट, छत्र्यांचा आधार घेण्‍यात आला. मंगळवारी सायंकाळी काही भागात रिमझिम, तर पश्‍चिम भागात दमदार पावसाने हजेरी लावली.

सोमवारपासून ‘आर्द्रा नक्षत्र’ सुरू झाले असून, पहिल्‍याच दिवशी पावसाळी वातावरणामुळे मान्सून सक्रिय होणार असल्‍याचे संकेत मिळाले होते. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची काही काळ तारांबळ उडाली. रस्‍त्‍यावर रेनकोट व छत्रीचा आधार घेत वाहनचालक व पादचारी लक्ष वेधून घेत होते. बाजारपेठेत पावसाला सुरुवात होताच रस्त्यावरील विक्रेते छत्री आणि रेनकोट घेऊन बसल्याचे पाहायला मिळाले. रिमझिम पावसामुळे बाजारपेठेतील गर्दीवर परिणाम जाणवला. काही वेळ रिमझिम तर काही वेळ उघडीप असे चित्र होते.

मृग नक्षत्र पूर्ण कोरडे गेल्‍यानंतर शेतकर्‍यांच्‍या नजरा आर्द्रा नक्षत्राकडे लागून होत्‍या. ८ जूननंतर पावसाने दडी मारल्‍याने पंधरा दिवस खरीप हंगामातील पेरण्‍यांची बिकट स्‍थिती निर्माण झाली होती. मंगळवारी सकाळपासून आभाळ ढगांनी डवरून आले होते. दुपारी तीनच्‍या सुमारास बेळगाव तालुक्‍याच्‍या पश्‍चिमेकडे पावसाला सुरुवात झाली.

पावसाकडे सर्वांच्‍या नजरा

जून महिन्‍यात दोन दिवस हजेरी लावून मान्‍सून गायब झाल्‍यानंतर बेळगाव जिल्‍ह्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते. खरीप हंगामातील पेरण्‍या खोळंबून होत्‍या. पेरणी केलेली पिके पावसाअभावी कोमेजून जात होती. विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी खालावल्‍याने पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई निर्माण झाली होती. आता मान्‍सून सक्रिय झाला असून, सर्वांचे लक्ष दमदार पावसाकडे लागून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT