Vitthal Halgekar 
बेळगाव

Vitthal Halgekar | मी पक्षादेशानुसारच मतदान केले : आमदार विठ्ठल हलगेकर

क्रॉस व्होटिंगच्या बातम्या पूर्णपणे खोट्या, विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : विधान परिषद निवडणुकीत मी पक्षादेशाविरोधात जाऊन क्रॉस व्होटिंग केल्याच्या सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या, बिनबुडाच्या व बदनामी करण्याच्या उद्देशाने पसरविण्यात आल्या असल्याचा खुलासा आमदार विठ्ठल हलगेकर यांनी केला आहे. ते गुरुवारी (दि. २) खानापूरमधील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, २०२३ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभव विरोधकांच्या अजूनही जिव्हारी लागला आहे. तो पराभव पचवता न आल्यामुळेच माझ्याविरोधात सातत्याने खोटे आरोप व अफवा पसरविण्याचे काम सुरु आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने दिलेल्या 'व्हिप'नुसारच मी मतदान केले असून पहिली पसंती भाजपचे अधिकृत उमेदवार निंगप्पा पाटील यांना तर दुसरी पसंती निजदचे उमेदवार गोविंदराजू यांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत एका कन्नड वृत्तवाहिनीने मी क्रॉस व्होटिंग केल्याची खोटी बातमी सोशल मीडियावर प्रसारित केली. मात्र, सत्य समोर आल्यानंतर संबंधितांनी ती बातमी अवघ्या पाच मिनिटांत हटविली. तरीदेखील विरोधकांनी त्याच बातमीचा स्क्रीनशॉट विविध सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल करुन खानापूर तालुक्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

तालुक्यात सुरु असलेल्या विकासकामांना अडथळा आणणे आणि आपली राजकीय प्रतिमा मलिन करणे हा या कटामागील उद्देश असल्याचा आरोप हलगेकर यांनी केला. यावेळी भाजपचे अध्यक्ष बसवराज सानिकोप, माजी आमदार अरविंद पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, ज्येष्ठ नेते बाबुराव देसाई, सदानंद पाटील, जोतिबा रेमाणी, मल्लाप्पा मारीहाळ, चेतन मणेरीकर, प्रशांत लक्केबेलकर, शंकर पाटील, राहुल आळवणी, सदानंद मासेकर, गोपाळ भेकणे, दत्ता कदम आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT