बेळगाव : दहावी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी शिक्षण खात्याने होळीकट्टीतील (ता. कित्तूर) डॉ. एपीजे अब्दुल कलाम निवासी शाळेत ‘मिशन 625’ नावाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत निवडक विद्यार्थ्यांना दहावीत 625 पैकी 625 गुण मिळविण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. विविध शाळांमधील 42 विद्यार्थ्यांकडून 36 दिवस मोफत व्यवस्थेसह विशेष तयारी करवून घेतली जात आहे. याच धर्तीवर प्रत्येक गटशिक्षणाधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रयत्न करण्याची गरज आहे.
कित्तूर गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने 5 फेब्रुवारीपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. यांतर्गत तालुक्यातील 25 सरकारी व अनुदानित कन्नड माध्यम उच्च माध्यमिक शाळांतील 42 टॉपरना एकत्र आणले आहे. त्यात 34 मुली व 8 मुले आहेत. आमदार बाबासाहेब पाटील, गटशिक्षणाधिकारी चन्नबसाप्पा तुबाकी यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शिक्षकांचे एक पथक तयार केले आहे. हे पथक मुलांकडून पैकीच्या पैकी गुण मिळविण्यासाठी तयारी करवून घेत आहे.
मुलांचा दैनदिन उपक्रम काय?
मुले रोज पहाटे 4.30 वाजता उठतात. त्यानंतर सर्व कामे उरकून घेतात. सकाळी 6 ते 6.30 या वेळेत योग, व्यायाम, ध्यान करतात. नाश्ता झाल्यानंतर सकाळी 8 ते दुपारी 1.30 पर्यंत वर्ग घेतले जातात. जेवणाच्या सुट्टीनंतर दुपारी 2.30 ते 5.30 पर्यंत पुन्हा वर्ग होतात. सहा वाजता मुले अभ्यासाला बसतात. काही समस्या असल्यास त्यांचे निरसन केले जाते. रात्री 10.30 पर्यंत मुले अभ्यास करत असतात.
परीक्षा संपेपर्यंत विश्रांती नाही
विषयांच्या युनिटवर परीक्षा घेतली जात आहे. एलबीए (लेसन बेस्ड असेसमेंट) विशेष भर देण्यात आला आहे. अन्य 16 गुणांसाठी प्रश्न तयार करुन अभ्यास घेतला जात आहे. गत 26 दिवसांपासून वर्ग घेतले जात असून ते 10 मार्च रोजी संपणार आहेत. त्यानंतर सहा शिक्षक व्हॉट्स ॲप ग्रुप मधील 42 मुलांशी परीक्षा संपेपर्यंत संपर्कात राहतील.
तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन
तालुक्यातील 235 हून अधिक शिक्षकांना ‘मिशन 625’ मध्ये समाविष्ट करून घेतले आहे. हे शिक्षक आपल्या दिवशी येऊन विद्यार्थ्यांची शिकवणी घेतात. प्रत्येक दिवशी सहा विषयांचे मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यावर क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, नोडल अधिकारी संगीता होसूर, गटशिक्षणाधिकारी तुबाकी लक्ष देऊन आहेत. त्यासह अन्य बंगळूरहून अधिकारी पाहणी करून मार्गदर्शन करत आहेत.