बेळगाव

Mother and Son Reunion: १२ वर्षांचा सतीश बेपत्ता, २६ वर्षांनी सलीम बनून हजर!

सर्कशीच्या मेळ्याबरोबर हरवला; अडीच दशकांनी मुलाला पाहून आई गहिवरली

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बारा वर्षाचा असताना सतीश खेळता खेळता बेपत्ता झाला... एका सर्कशीच्या मेळ्यासोबत तो गेला, तो गेलाच... परंतु, जेथून बेपत्ता झाला होता, तिथे तो २६ वर्षांनी योगायोगाने पुन्हा आला असता त्याच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..तो परिसर...तो रस्ता...ते घर असे ओळखीचे दिसू लागले....अन्‌ त्याआधारे त्याने स्वतःचे घरही शोधून काढले आणि आईही भेटली....परंतु, सतीश म्हणून चुकलेला हा बालक आता ३७ वर्षाचा सलीम आणि तो देखील दोन मुलांचा बाप बनून घरी परतला....

फक्त चित्रपटातच नव्हे, तर प्रत्यक्षातही असे घडून शकते. ते घडले आहे सतीश ऊर्फ सलीमच्या बाबतीत. ही घटना आहे २००० सालची. तेव्हा सतीश बारा वर्षांचा होता. मंगळूर जिल्ह्यातील बेळतांगडी तालुक्यातील धर्मस्थळ येथील अशोकनगरमध्ये अक्कू नामक महिलेचा हा मुलगा सतीश. ती सतीशला घेऊन धर्मस्थळ येथे सर्कस पाहण्यासाठी गेली होती. दोघांनी सर्कस पाहिलीही. परंतु, सर्कशीचे सतीशला इतके आकर्षण वाटले की तो हत्ती, उंट असे प्राणी पाहण्यासाठी सर्कस परिसरातच लपून बसला. आईने बरीच शोधाशोध केली. पण तो सापडला नाही. त्यानंतरही तिने धर्मस्थळला अनेक हेलपाटे घातले, मंदिरात जाऊन नवस केले. परंतु, सतीश काही सापडला नाही. आपला मुलगा जेथे चुकला आहे, तेथेच परत येईल, असे म्हणत ती वर्षानुवषे रडत राहिली.

सर्कससोबत गेला सलीम झाला

लपून बसलेला सतीश सर्कशीच्या मेळ्याबरोबर राहू लागला. नंतर तो सर्कशीसोबत महाराष्ट्रात निघून गेला. तेथून सतीशच्या आयुष्याने वेगळीच कलाटणी घेतली. आपले गाव, शेजारी सोडून तो आता महाराष्ट्रीयन बनला. त्याचे सतीश हे नाव हळुहळू लोप पावले. सर्कशीत त्याला सलीम अब्दुल अन्सारी असे नवीन नाव मिळाले. यानंतर मोठा झालेल्या सतीश उर्फ सलीमने तालीमा नामक तरुणीशी लग्न केले. आता त्याला आझम व खुशी अशी दोन मुले आहेत.

नियतीने पुन्हा आणले

भाषा, धर्म आणि सर्वकाही बदललेला सलीम आता पक्का महाराष्ट्रीयन बनला होता. परंतु, नियतीने त्याचा पुन्हा एकदा धर्मस्थळचा प्रवास घडवून आणला. काही दिवसांपूर्वी तो मित्रासोबत धर्मस्थळला पर्यटक म्हणून गेला. जेव्हा तो धर्मस्थळला उतरला तेव्हा त्याचे मन अचानक भूतकाळात गेले. या परिसराशी आपला काहीतरी संबंध आहे, असे त्याला जाणवू लागले. मग बाल्यावस्थेतील एकेक गोष्टी त्याला आठवत गेल्या. आपण सर्कस पाहण्यासाठी येथे आलो होतो. त्याला आपले नाव, आडनाव सर्वकाही आठवले. खातरजमा करण्यासाठई सतीशने एका दुकानदाराला अक्कू नामक महिलेचे घर विचारले. दुकानदाराने पत्ता सांगितला. त्याबरोबर सतीश ऊर्फ सलीम आपल्याला रस्ता माहिती असल्यासारखा अगदी सहजरित्या रस्त्याने निघाला आणि त्याच्या घरी पोहोचला.

आई गहिवरली

घरी पाऊल ठेवताच त्याने आईला पाहून 'आई.....' अशी हाक मारली. तेव्हा इतक्या वर्षांनी व संपूर्ण अंगकाठी बदललेला हा कोण? असे आईला वाटले. परंतु, त्याने आपण सतीश असे सांगत जुन्या आठवणी सांगायला सुरवात केली तेव्हा आईलाही गहिवरून आली. ती पट्कन खालीच बसली. कित्येक वर्षे शोध घेऊन थकलेल्या त्या माऊलीला अखेर तिचा मुलगा भेटला. आपले डोळे मिटण्याआधी एकदा आपला मुलगा भेटू दे, अशी ती देवाकडे सतत प्रार्थना करत होती, ती सफल झाली, असे शब्द तिच्या तोंडून उमटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT