Belgaum crime Pudhari
बेळगाव

Belgaum crime: शाळेच्या आवारात समाजकंटकांचा धुडगूस

कंग्राळी खुर्दमधील प्रकार : फरशांची तोडफोड, क्रीडांगणावर मद्याच्या बाटल्या

पुढारी वृत्तसेवा

कंग्राळी : कंग्राळी खुर्दमधील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या व्हरांड्यातील फरशांची पुन्हा तोडफोड करण्यात आली आहे. क्रीडांगणावर संडास करणे, मद्याचा मोकळ्या बाटल्या, गुटका पाकीटे टाकण्याचे प्रकार आढळत आहेत. यामुळे ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

गावच्या मराठी शाळेच्या आवारात नेहमीच समाजकंटकाचा वावर असतो. गेल्या आठ-दहा वर्षांपासून वारंवार संरक्षक भिंत फोडणे, प्रवेशद्वाराची मोडतोड करणे, वर्गखोल्यांचे कुलूप तोडून साहित्य लांबवणे, स्वच्छतागृहातील भांडी फोडणे, व्हरांड्यातील फरशा फोडणे असे प्रकार घडत आहेत. याबाबत तक्रार करुनही परिणाम शून्य आहे. त्याचबरोबर शाळेच्या बाहेरील बाजूने भिंतीनाही मोठ्या प्रमाणात चिखलमातीचे ठसे जाणूनबुजून उमटवले जात असल्याचा संशय असून त्या मळलेल्या स्थितीत आहेत. रंगरंगोटी केली तरी पुन्हा हीच स्थिती होते असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

काहीवेळा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवले की दोन-चार दिवसात तोडून टाकले जातात. पुन्हा पुन्हा असे प्रकार घडत असल्याने शाळा प्रशासन, एसडीएमसी वैतागून गेली आहे. त्यामुळे, गावपातळीवर याबाबत चर्चा करून कठोर निर्णय घेऊन अशा विध्वंसक प्रवृतीला आळा घातला पाहिजे अशी मागणी होत आहे. ज्ञान मंदिरात आणि तेही फक्त मराठी शाळेत असे प्रकार वारंवार घडत आहेत. येत्या 30 व 31 मे रोजी शाळेचा शतकोत्तर महोत्सव होणार आहे. यानिमित्ताने रंगरंगोटी करण्याचे नियोजनही आहे. तत्पूर्वी समाजकंटकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT