बेळगाव : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा पोक्सो न्यायालयाने 30 वर्षांचा सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. मंजुनाथ शंकर मोकाशी (रा. मास्तीहोळी ता. हुक्केरी) असे त्याचे नाव आहे.
मंजुनाथ याने 23 जून 2025 रोजी अल्पवयीन मुलीला भाडोत्री खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर सदर घटना कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. त्या मुलीने घाबरत आपल्या पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर पालकांनी मंजुनाथच्या विरोधात अंकलगी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक यमनाप्पा मांग यांनी फिर्याद दाखल करून घेतली. पोलिस निरीक्षक सुरेशबाबू आर.बी. यांनी या प्रकरणाचा तपास करून पोक्सो न्यायालयात दोषारोप दाखल केले. न्यायालयात 10 साक्षी 70 कागदपत्रे पुरावे, 8 मुद्देमाल तपासण्यात आले. त्यामध्ये मंजुनाथ हा दोषी आढळला.
याप्रकरणी न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी आरोपी मंजुनाथला 30 वर्षांचा सश्रम कारावास, 1 लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. पीडित मुलीला जिल्हा कायदा सेवा प्राधिकारने 4 लाख रुपये देण्याचे आदेश बजावले आहेत. सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.