खानापूर : शिक्षक भरती प्रक्रियेत भाषिक अल्पसंख्याक उमेदवारांना संधी मिळण्याबाबत अधिवेशनात चर्चा घडवून आणण्याची ग्वाही आरोग्य व अल्पसंख्याक मंत्री यू. टी. खादर यांनी दिली.
खानापूर आणि बेळगाव येथून गेलेल्या डीएड, बीएड धारक उमेदवारांनी आज सोमवारी खादर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन शिक्षक भरतीतील मराठी व उर्दू माध्यमाच्या उमेदवारांवर झालेला अन्याय त्यांच्या निदर्शनास आणून दिला. आगामी शिक्षक भरतीसाठी नुकताच जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत मराठी, उर्दू भाषिक अल्पसंख्याक शाळांमधील रिक्त शिक्षकांच्या जागांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तेथे शिकणाऱ्या मुलांसह नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेकडो डीएड व बीएड धारक उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले असल्याची माहिती देण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊन खादर यांनी अधिवेशनात या प्रश्नी सरकारचे लक्ष वेधून गांभीर्याने चर्चा घडवून आणण्याची ग्वाही दिली. यावेळी गणपती बावकर, दामोदर पाटील, मोहन पाटील यांच्यासह डीएड व बीएड धारक उपस्थित होते.