बेळगाव, बंगळूर : बेकायदेशीर आर्थिक व्यवहार आणि परदेशातील अनियमित गुंतवणुकीच्या आरोपांबाबत ई़डीने बोलावल्यास आपण चौकशीसाठी हजर राहू, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
जारकीहोळी यांनी काँगो देशातील सोन्याच्या खाणीत गुंतवणूक केल्याचा दावा ईडीने अधिकृतपणे केला आहे. परदेशी गुंतवणुकीबाबत ईडीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे यापूर्वीच दिली आहेत. अधिकाऱ्यांनी अधिक माहितीची गरज असल्याचे दर्शवून चौकशीसाठी उपस्थित राहण्याची विनंती केल्यामुळे, आवश्यक तपशील देण्यासाठी आपण निश्चित वेळी हजर राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्याविरुद्ध रचल्या गेलेल्या कथित सुनियोजित राजकीय कटाबाबत बोलताना त्यांनी, या छाप्यांमागे कोण आहे आणि ईडीकडे तक्रार कोणी केली, याची त्यांना कल्पना आहे; ही माहिती खुद्द ईडीच्या अधिकाऱ्यांनीच त्यांना दिली होती. मात्र, याबद्दल आपण आता काहीही बोलणार नाही आणि योग्य वेळी सर्व गोष्टी उघड करू, असेही त्यांनी नमूद केले. आपण किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांनी कोणतीही बेकायदेशीर गुंतवणूक किंवा गैरकृत्ये केलेली नाहीत, तसेच परदेशात कोणतीही गुंतवणूक केलेली नाही; केवळ परदेशी गुंतवणुकीबाबत चर्चा झाली होती. विजय मल्ल्या यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले.
प्रतिमा मलीन झाली नाही
छाप्यांमुळे आपली प्रतिमा मलीन झालेली नाही आणि आपण कोणताही गैरप्रकार केलेला नाही. ईडीने मागितलेली सर्व माहिती सादर केल्यानंतर, त्या माहितीच्या आधारे प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान सहा महिने लागतील आणि त्यानंतर कदाचित चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते; अशा समन्सचे पालन करण्यास आपण तयार आहोत, असे मंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले.
विजय मल्ल्या संतप्त
उद्योगपती विजय मल्ल्या यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यावारी ईडी छाप्यांवर संताप व्यक्त केला आहे. एक्स या समाजमाध्यमावरच्या संदेशात त्यांनी म्हटलेय की, ईडी आरोपपत्र दाखल न करता एका व्यक्तीची ओळख सार्वजनिकरित्या नष्ट करत आहे. अशा प्रकारची घटना इतर कोणत्याही देशात घडत नाही. कोणत्याही देशातील कोणतीही तपास यंत्रणा निष्पक्ष चौकशीशिवाय आपल्या कार्याबद्दल बोलणार नाही. पण हे ईडी करते. ही लज्जास्पद बाब आहे. माझ्यावर ईडी आणि सीबीआयने केलेले खोटे आरोप उघडकीस आणीन. या संस्था फसवणूक करण्यात अत्यंत माहिर आहेत.