बेळगाव : सौंदत्ती यल्लम्मा डोंगरावर पायाभूत सुविधांसाठी विकासाची कामे त्वरित सुरु करण्यात यावीत, अशा सूचना कायदा व पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी केल्या. यल्लम्मा देवस्थानाच्या आराखड्यासंदर्भात शुक्रवारी (दि. 6) विकास आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
100 कोटी रुपयांच्या विशेष अनुदान आणि प्रसाद योजनेंतर्गत देण्यात येणार्या 18.37 कोटी रुपयांच्या अनुदानातून करावयाच्या कामांबाबत त्यांनी अधिकार्यांशी सविस्तर चर्चा केली. प्रसाद योजनेंतर्गत दोन बहुउद्देशीय इमारत, शौचालये, बाथरुम, माहिती केंद्रे, कॅन्टीन, प्राथमिक आरोग्य केंद्र, कचरा व्यवस्थापन युनिट आणि डिजिटल माहिती फलक बसविण्याबाबत त्यांनी चर्चा केली. त्याचप्रमाणे 100 कोटी रुपयांच्या विशेष सहाय्य योजनेंतर्गत भाविकांसाठी रांग संकुल, पार्किंग व्यवस्था, महाप्रसाद भवन, व्यावसायिक दुकाने, प्रशासकीय इमारत बांधण्याची योजना आखण्यात आली आहे.
मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीबाबत सौंदत्तीत नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले. भाविकांना देवी दर्शन, जेवण, पार्किंग, शौचालय व्यवस्था यासह कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यल्लम्मा देवस्थानाच्या व्यापक विकास आराखड्याची माहिती दिली. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, पर्यटन विकास मंडळाच्या अधिकारी गीता कौलगी, पर्यटन विभागाच्या सहसंचालिका सौम्या बापट आणि विविध विभागांचे अधिकारी बैठकीत उपस्थित होते.