बेळगाव : कन्नडसक्तीविरोधी आंदोलनात १९८६ मध्ये सहभागी झालेले महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनी समाज माध्यमांवर लढ्याच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. त्यात त्यांनी अन्यायाविरोधात निर्भयपणे उभे राहून मराठी जनतेच्या हक्कांसाठी दिलेला तो लढा आजही तितकाच प्रेरणादायी आणि स्मरणीय आहे, असे सांगतानाच अनेक दशकांनंतरही या प्रश्नाची अद्याप सुटका झालेली नाही, याची खंत असल्याचे नमूद केले आहे.
भुजबळ यांनी १९८६ मध्ये वेषांतर करुन बेळगावात दाखल झालेले फोटो अपलोड केले असून त्याठिकाणी अस्मितेच्या संघर्षाची चार दशके या शिर्षकाखाली घटनाक्रमही विषद केला आहे. सीमाभागातील मराठी बांधवांवरील अन्यायाविरोधात आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी बेळगावच्या भूमीत घुमलेल्या ऐतिहासिक लढ्याला आज ४० वर्षे पूर्ण होत आहेत. कर्नाटकाच्या सीमावर्ती भागात मराठी माणसांवर होत असलेल्या सरकारी अन्यायाविरोधात निर्भयपणे उभे राहून मराठी जनतेच्या हक्कांसाठी दिलेला तो लढा आजही तितकाच प्रेरणादायी आणि स्मरणीय आहे. १९५६ च्या राज्य पुनर्रचनेनंतर बेळगाव, कारवार, निपाणी, खानापूर, बिदर, भालकी यासारखे मराठी भाषकबहुल भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून सीमाप्रश्न हा महाराष्ट्राच्या मनातील वेदना आणि मराठी जनतेच्या न्यायाच्या लढ्याचे प्रतीक बनला. दुर्दैवाने, अनेक दशकांनंतरही या प्रश्नाची अद्याप सुटका झालेली नाही, याची खंत आहे, असे म्हटले आहे.
जून १९८६ मध्ये सीमाभागातील मराठी बांधवांवर कन्नड भाषेची सक्ती लादण्याचा प्रयत्न झाला. मराठी भाषकांचा आवाज दाबण्याच्या या प्रयत्नाविरोधात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक आंदोलनाची हाक देण्यात आली. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातून बेळगावात जाणारे सर्व मार्ग बंद केले होते. मात्र, मराठी स्वाभिमानासाठी कोणतीही अडचण आडवी येऊ नये, या निर्धाराने गनिमी काव्याची रणनीती आखण्यात आली. मी स्वतःची ओळख लपवण्यासाठी मिशी काढून, शर्ट-पॅन्ट, गळ्यात टाय, खोटी दाढी आणि हातात सिगार घेऊन दुबईचे व्यापारी ‘इक्बाल शेख’ यांचा वेश धारण करून कर्नाटकात कूच केली. ही वेशभूषा इतकी अचूक होती की अनेक जवळच्या व्यक्तींनीही मला ओळखले नाही. मुंबईहून गोवामार्गे बेळगावकडे जाताना पोलिसांचा ससेमिरा चुकवत अखेर बेळगावात प्रवेश करण्यात यश आले, असे ते लिहितात.
४ जून १९८६ च्या रात्री बेळगावात पोचून, दुसऱ्या दिवशी शेकडो शिवसैनिकांसह कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले. या अनपेक्षित आणि धाडसी कृतीने कर्नाटक प्रशासन हादरून गेले. त्यानंतर धारवाड जिल्हा कारागृहात तब्बल १६ दिवस शासकीय कोठडी भोगावी लागली. या संघर्षात दगडू सकपाळ, बाबा पिंगळे, अरविंद तायडे, हेमंत मंडलिक आणि असंख्य निष्ठावंत शिवसैनिकांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली, असे त्यांनी समाजमाध्यमांवर नमूद केले आहे.