बेळगाव

Dr.Yashwant Patne | बेळगावच्या मातीत मराठी साहित्य समृद्ध : डॉ. यशवंत पाटणे

सातवे अ. भा. बेळगाव मराठी साहित्‍य संमेलन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : बेळगावच्‍या भूमीला लेखक-कवींची थोर परंपरा आहे. अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतलद्वारे मराठी रंगभूमीला नवचैतन्य दिले. जी. ए. कुलकर्णी, इंदिरा संत, प्रकाश संत, कृ. ब. निकुंब आणि उत्तम कांबळे असे अनेक दिग्गज साहित्यिक सीमाभागात घडले. सीमाभागात महाराष्‍ट्रीय संस्‍कृतीचे दर्शन घडते. बेळगावच्या मातीने मराठी साहित्याला समृद्ध केले आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्‍यक्ष माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्‍य परिषद व मराठा मंदिर आयोजित सातव्‍या अ. भा. बेळगाव मराठी साहित्‍य संमेलनात अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते.

आधुनिक काळातील जीवनशैली, बदलती कुटुंबव्यवस्था आणि सामाजिक मूल्यांचा ऱ्हास यावर मार्मिक भाष्य करताना डॉ. पाटणे म्‍हणाले, आजच्या युगात माणसाला 'विश्वदर्शन' घडत असले तरी स्वतःचे 'आत्मदर्शन' घडवण्याची खरी गरज आहे. टीव्ही आणि मोबाईलच्या अतिवापरामुळे वाचक कमी होऊन प्रेक्षक वाढले आहेत. दूरदर्शनवरील मालिका कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त करत असून, या गर्दीतून स्वतःला बाजूला काढल्यासच मराठी संस्कृती आणि कुटुंबव्यवस्था टिकू शकेल. निसर्गाने निर्माण केलेल्या अंधारापेक्षा मानवाने मूल्यांची पायमल्ली करून निर्माण केलेला अंधार अधिक भयानक आहे. हा मानवनिर्मित अंधार दूर करण्यासाठी साहित्यिकांनी पुढे येऊन निर्भयपणे सत्य शोधण्याची गरज व्यक्त केली.

आजच्या पिढीला झटपट श्रीमंत होण्याचे आकर्षण असून, लोक साधेपणातील खरा आनंद गमावत चालले आहेत. गांधीजींचे विचार आज केवळ नेत्यांच्या भाषणापुरते आणि नोटांवर उरले आहेत, त्यांचे साधुत्व लोप पावत चालले आहे. आपण एकीकडे निसर्गाची आणि मायबोली मराठीची स्तुती करतो, तर दुसरीकडे झाडे तोडली जाणे आणि मराठी शाळा बंद पडणे हे वास्तव आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आज आपण विवेक गहाण ठेवला आहे. विवेक हा मनातच असतो, पण तो जागा करावा लागतो. मन सुद्धा विचारांनी घुसळावे लागते, तेव्हा विवेक जन्माला येतो. विवेक म्हणजे सारासार विचार करण्याची बुद्धी, विज्ञान दृष्टी आणि प्रश्न विचारण्याची सवय होय. लोकशाहीत कठोर सत्याची चर्चा झाली पाहिजे. आज जे विजयी होते, त्याला सत्य म्हणावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. सत्याचा विजय होईल याची खात्री नाही, कारण लबाडीने विजयी झालेल्यालाही सत्य म्हणावे लागते. ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे अविवेकाची काजळी दूर केल्याशिवाय विवेकाचा दिवा उजळणार नाही. खांडेकरांच्या मते, मनाच्या मैदानात एका बाजूला विवेक आणि दुसऱ्या बाजूला उडाणटप्पू नावाचा पैलवान असतो; प्रत्येकाच्या मनात या दोघांची कुस्ती सुरू असते. मोहावर विजय मिळवायचा असेल, तर संत साहित्यात रमले पाहिजे. गौतम बुद्ध मनाला शेती आणि स्वतःला शेतकरी मानायचे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

डॉक्टर आंबेडकरांनी म्हटले होते की, जो देश आपला इतिहास विसरतो, त्याला इतिहासाच्या पुनरावृत्तीची शिक्षा मिळते. ज्याच्या हातात लोककल्याणाची साधने असतात त्याला भूतकाळाचे भान, वर्तमानाची जाण आणि भविष्याची दृष्टी असावी लागते तरच मानवतेच्या आणि विचारांच्या विकासाचे पर्व उभे राहते, असे त्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT