बेळगाव : महापालिकेत नव्याने कन्नडसक्ती करण्यात आली असून, हा विषय गुरुवारी (दि. 24) होणार्या सर्वसाधारण सभेत गाजण्याची शक्यता आहे. महापालिकेवर भाजपची सत्ता असली, तरी बहुतांशी नगरसेवक मराठी भाषिक आहेत. केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या नियमांनुसार बेळगावसह सीमाभागात कन्नडबरोबर मराठीतही व्यवहार करणे आवश्यक आहे. या नियमांनुसार मराठी भाषिक नगरसेवक या सभेत मराठीचा आग्रह धरतात का, याकडे बेळगाववासीयांचे लक्ष आहे.
गुरुवारच्या सभेत एकूण 19 विषयांवर चर्चा होणार असून, चार विषय गेल्या सभेतील आहेत. महापालिका सभागृहात सकाळी 11 वाजता महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल.
महापालिकेत करण्यात आलेली कन्नडसक्ती, महापौर पवार यांनी नाकारलेले वाहन यावरून सभा गाजण्याची शक्यता आहे. या सभेत कचरा संकलनासाठी साहित्याची खरेदी करणे, इमारतींना बांधकाम पूर्णत्वाचा परवाना देणे, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भूयारी मार्गात विकासकामे करणे, कोल्हापूर सर्कल येथील बेकायदा एलपीजी पेट्रोल पंपावर कारवाई करणे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, अशोकनगर येथील बॅडमिंटन कोर्टची देखभालीसाठी निविदा काढणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.