बेळगाव : डॉ. वाय. डी. मंजुनाथ यांनी प्रत्येक कामासाठी लाच घेतल्याची माहिती ईडीच्या तपासात समोर आली आहे. परवाना नूतनीकरण, बार अन्यत्र हलविणे व नवीन परवाना देण्यासाठी लाच घेतलीच, शिवाय दरमहा प्रत्येक बार चालकाकडून ठराविक रक्कम घेतल्याचेही ईडीने केलेल्या तपासात उघड झाले आहे. त्यांच्याकडे एकूण १३ कोटी ३० लाखांचा मुद्देमाल सापडला आहे.
डॉ. मंजुनाथ यांच्यावर बुधवारी बेळगाव, गोवा, बंगळूरसह दहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. ते स्वतःचे बार चालवत होते. परंतु, हे स्वतःच्या नावे न ठेवता, नातेवाईक, कुटुंबीय मित्र- मैत्रिणी यांच्या नावे त्याचे परवाने घेतले होते. अन्य बार चालकाकडून दरमहा ठराविक हप्ता निश्चित केला होता. ही सर्व रक्कम ते धनादेश अथवा ऑनलाईन न स्वीकारता सर्वकाही रोख रक्कमेत घेत असल्याचेही समोर आले आहे. ही मिळालेली सर्व रक्कम त्यांनी जमीन, भूखंड व अन्य मालमत्ता खरेदीसाठी वापरल्याचे ईडी तपासात स्पष्ट झाले आहे.
मनी लॉन्ड्रिंगचा प्रकारही त्यांच्याकडून झालेला आहे. मंजुनाथ यांच्याकडे सध्या ५ कोटी ५० लाखांची रोकड, ३ कोटी ३० लाखांची फॉरेन करन्सी व ७ कोटी ८० लाखांचे सोने असा एकूण १३ कोटी ३० लाखांचा मुद्देमाल सापडल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.
अबकारीच्या प्रत्येक अधिकाऱ्यांचे बार
ईडीच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. फक्त डॉ. मंजुनाथ हेच स्वतःचे बार चालवत नसून अबकारी खात्यातील बहुतांशी अधिकारी इतरांच्या नावे बार, रेस्टॉरंट तसेच अन्य व्यवसाय चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोख रकमेत लाच घ्यायची, त्याद्वारे मालमत्ता खरेदी करायच्या अथवा कोणाच्या तरी नावाने बार परवाना घेऊन त्याद्वारे मोठी रक्कम मिळवायची. असा प्रकार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये सुरू असून, यामध्ये बहुतांशी अबकारी अधिकारी असल्याचे समजते.