अंकली : मोबाईल, टी. व्ही. मालिकांच्या गराड्यात हरवत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तकाकडे वळविण्यासाठी तसेच अभ्यासाची शिस्त अन् गोडी लावण्यासाठी मांजरीतील एकता सोशल फाऊंडेशन व नागरिकांतर्फे सायंकाळी 7 वाजता अभ्यासाचा भोंगा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभत असून भोंगा वाजता गावातील सर्व विद्यार्थी अभ्यासाला बसत आहेत.
एकता सोशल फाऊंडेशनचे कार्यकर्ते दिलीप पवार, डॉ. विजयकुमार उपाध्ये, सुरेश मांगलेकर, संजय नांद्रे व कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या सहकार्याने या अभिनव उपक्रमाचे पाऊल उचलले आहे. अभ्यासाची शिस्त लावण्यासाठी काही दिवसापासून रोज अभ्यासाचा भोंगा सुरू केला आहे. त्याला विद्यार्थ्यांसह पालकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रोज भोंगा वाजल्यावर विद्यार्थी टी. व्ही. आणि मोबाईल पाहायचे बंद करून अभ्यासाला बसतात. सायंकाळी 7 ते रात्री 9 असा दोन तास अभ्यास केला जातो. सोशल मीडियाच्या गराड्यात अडकलेली लहान मुले, विद्यार्थी यांना बाहेर काढण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय निर्माण झाल्याचे अनेक पालकांनी सांगितले.