अथणी : भाऊबंदकीतील वादातून मंगसुळी गावच्या वेशीत युवकाचा खून करण्यात आला आहे. अशोक मारुती वड्डर (वय 23, रा. मंगसुळी, ता. कागवाड) असे मृताचे नाव आहे. रिक्षा स्थानकावर रिक्षा उभी करण्याच्या वादाचे निमित्त करून पूर्ववैमनस्यातून हा खून करण्यात आला आहे. त्याबद्दल तीन सख्ख्या भावांना अटक झाली आहे. घटनेमुळे मंगसुळी परिसरात खळबळ माजली आहे.
सागर संभाजी वड्डर, शिवा संभाजी वड्डर आणि विनोद संभाजी वड्डर (सर्व रा. उगार) अशी तीन संशयित भावांची नावे आहेत. वड्डर कुटुंबात भाऊबंदकीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता. त्यातच बुधवारी मंगसुळीच्या वेशीत रिक्षा स्टँडवर रिक्षा लावण्याच्या कारणावरून वाद वाढत जाऊन तिघा भावांनी मिळून अशोकवर हल्ला करून त्याचा खून केला.
खुनामागील नेमका हेतू तसेच आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास कागवाड पोलिस करीत आहेत. घटनास्थळी सीपीआय संतोष हळूर व उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांनी भेट देऊन पाहणी केली.