चिकोडी : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका पतीने पत्नीचा अमानुष खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीला गळफास लावून ती तडफडत असताना पती तिचे चित्रीकरण करत होता. विवाहिता तडफडत असताना पतीने आपल्या सासऱ्यांना व्हिडीओ कॉल करून ते दृश्यही दाखवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बागलकोट जिल्ह्यातील गलगली गावात ही संतापजनक घटना घडली आहे. भाग्यश्री जिगलूर (वय २३) असे मृत महिलेचे नाव असून, प्रवीण जिगलूर असे तिच्या पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रवीणने आधी लाकडी दांडक्याने भाग्यश्रीला मारहाण केली. त्यानंतर तिला गळफास लावला. पत्नी गळफासाने तडफडत असताना प्रवीण तिचे मोबाईलवर चित्रीकरण करत होता.
गेल्या काही महिन्यांपासून या पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. या त्रासाला कंटाळून भाग्यश्री दोन महिन्यांपासून आपल्या पालकांकडे राहत होती. त्यानंतर प्रवीणने आपण पुन्हा नव्याने संसार करू, असे सांगून तिची समजूत काढली आणि तिला परत घरी आणले. मात्र, घरी आणलेल्या पहिल्याच दिवशी त्याने अमानुषपणे तिचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच बिळगी पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी संशयित प्रवीण जिगलूर याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.