बंगळूर : बंगळूर, तुमकूर, यादगिरी, मंगळूर आणि विजापूर येथे एकाच वेळी छापे टाकणार्या लोकायुक्त अधिकार्यांनी 7 अधिकार्यांना अटक केली. यावेळी कोट्यवधी रुपयांची बेकायदेशीर मालमत्ता उघडकीस आणली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी (दि. 15) सकाळी झालेल्या कारवाईत 7 अधिकार्यांसह 40 ठिकाणी छापे टाकण्यात आले. रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, वाहने, घरे आणि जमिनीच्या नोंदींसह कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली.
प्रकल्प संचालक राजशेखर, तुमकूर येथील मंजुनाथ, विजापूर येथील आंबेडकर विकास महामंडळ अधिकारी रेणुका सातर्ले, बंगळूर येथील अतिरिक्त संचालक शहरी आणि ग्रामीण नियोजन संचालनालय मुरळी टी. व्ही, कायदेशीर सर्वेक्षण निरीक्षक एच. आर. नटराज, होस्कोट तालुका कार्यालय एसडीए अनंत कुमार, यादगीर शहापूर तालुका कार्यालयीन कर्मचारी उमाकांत यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानांवर छापे टाकण्यात आले.
बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांनंतर लोकायुक्त अधिकार्यांनी बंगळूरमध्ये 12, तुमकूरमध्ये 7, बंगळूरग्रामीणमध्ये 8, यादगीरमध्ये 5, मंगळूरमध्ये 4 आणि विजापूर येथे 4 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
जनतेकडून आलेल्या तक्रारींनतर लोकायुक्त अधिकार्यांनी विविध ठिकाणी छापे टाकले. याप्रकरणी उपलब्ध कागदपत्रांसह पुढील तपास करण्यात येत आहे.
लोकायुक्त पोलिसांनी तुमकूरमध्ये एकूण सात ठिकाणी छापे टाकले आहेत. निर्मिती केंद्राच्या एमडी लोकायुक्त अधिकार्यांनी राजशेखर यांच्या घरावर छापा टाकला. तसेच सप्तगिरी ब्लॉकमधील एसएस पूरम येथील राजशेखरच्या भावाच्या घरावर छापा टाकण्यात आला. बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपाखाली 10 अधिकार्यांनी एकाच वेळी हा छापा टाकला.
लोकायुक्त अधिकार्यांनी शहापूर, गुलबुर्ग्याचे तहसीलदार उमाकांता हळ्ळी यांच्या घरावरही छापा टाकला. त्यांनी अक्कमहादेवी लेआउटमधील तहसीलदारांच्या घरातील आणि कार्यालयातील फायलींची तपासणी केली. मंगळूर, यादगिरी लोकायुक्त अधिकार्यांनी मंगळूर येथील सर्वेक्षण पर्यवेक्षक मंजुनाथ आणि यादगिरी येथील शहापूर तालुका कार्यालय अधिकारी उमाकांत यांच्या घरावर आणि कार्यालयांवरही छापे टाकले.