बेळगाव : भाषावार प्रांतरचना करताना केंद्र सरकारने 1956 मध्ये बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीसह मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने तत्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. या अन्यायाच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी (दि. 1) सीमाभागात काळा दिन पाळण्यात येत आहे. मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवून काळा दिन गांभीर्याने पाळावा. सकाळी 9 वाजता संभाजी उद्यान येथून निघणार्या फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
काळ्यादिनी मराठी भाषिकांची ताकद केंद्र सरकरला दाखवून देण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून जनजागृती करण्यात आली आहे. तालुका, शहर, खानापूर आणि निपाणी म. ए. समितीकडून ठिकठिकाणी बैठका घेऊन जागृती करण्यात आली आहे. त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. त्यामुळे यंदाची फेरी आणि जाहीर सभा मोठ्या प्रमाणात होईल, असे सांगण्यात येत आहे. सकाळी 9 वाजचा संभाजी उद्यान येथून फेरीला सुरुवात होणार आहे. शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहापूर परिसरात फिरुन मराठा मंदिर येथे फेरीची सांगता होणार आहे. त्यानंतर मराठा मंदिर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी येणार्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे आणि काळे कपडे परिधान करावेत. फेरी शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे तसेच पदाधिकार्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शहर समिती, तालुका समितीने केले आहे. विविध संघटना आणि विविध भागातील कार्यकर्त्यानी फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे. खानापूर येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तर निपाणी येथे निषेध फेरी काढून जाहीर सभा होणार आहे.