बेळगाव ः ‘हुतात्मे अमर रहे, संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, अशा घोषणा देत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात धारातीर्थी पडलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. तर जोपर्यंत सीमावाद सुटत नाही, तोपर्यंत लढा कायम राहील, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.
शहर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात शनिवारी (दि. 17) हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी समिती कार्यकर्ते आणि मराठी जनता सहभागी झाली होती. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेतर्फे सीमालढ्यातील हुतात्म्यांना पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून करण्यात आले. ॲड. राजाभाऊ पाटील यांनी मशाल प्रज्वलित करुन हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रणजीत चव्हाण-पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, वैशाली भातकांडे, माजी महापौर सरिता पाटील, रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, माजी नगरसेवक नेताजी जाधव, प्रकाश मरगाळे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश शिरोळकर, ॲड. अमर येळ्ळूरकर, आप्पासाहेब गुरव, बापू जाधव, मदन बामणे, ड. महेश बिर्जे, माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी आदींनी हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले.
अभिवादनानंतर शहरात फेरी काढण्यात आली. हुतात्मा चौकातून प्रारंभ झालेली फेरी रामदेव गल्ली, खडेबाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनुसुरकर गल्ली, किर्लोस्कर रोड मार्गे पुन्हा हुतात्मा चौकात विसर्जित झाली. फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मराठी भाषिकांनी ‘अमर रहे अमर रहे हुतात्मे अमर रहे, बेळगाव-कारवार-निपाणी-बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेल में’ वगैरे घोषणा देऊन मार्ग दणाणून सोडला होता.
हुतात्मा चौकात झालेल्या सभेत बोलताना ॲड. पाटील म्हणाले, बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्राला जोडल्याखेरीज सीमालढा थांबणार नाही आणि त्याकरिता शपथबद्ध होण्याकरिता आपण हा हुतात्मा दिन आजतागायत पाळत आलो आहोत. या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने आपण आता थोडी प्रगती केली आहे. महाराष्ट्र सरकारने गेल्या चार वर्षापासून हा प्रश्न आपला मानला आहे. महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. आमची मागणी मान्य होईपर्यंत आपल्याला हा लढा चालू ठेवावा लागेल. आपल्यातील गेल्या 70 वर्षांपासून असलेले अभेद्य ऐक्य यापुढेही आपण कायम ठेवून या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहूया, असे आवाहन त्यांनी केले.
ॲड. सुधीर चव्हाण, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, दत्ता उघाडे, रावजी पाटील, अमित देसाई, अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, मोहन बेळगुंदकर, सुनील बाळेकुंद्री, मोतेस बारदेसकर, किरण परब, बी. ओ. येतोजी, श्रीधर खन्नूकर, मनोहर हलगेकर, सुधा भातकांडे, नेताजी जाधव, रमेश माळवी, शिवानी पाटील, महेश टंकसाळी, मदन बामणे, सुनील बोकडे, रणजीत हावळाण्णाचे, प्रशांत भातकांडे, राजू बिर्जे, श्रीकांत मांडेकर, अप्पासाहेब गुरव, अनिक कुट्रे आदी यावेळी उपस्थित होते.