अमित शहा 
बेळगाव

Amit Shah | गृहमंत्री अमित शहांना भेटणार म. ए. समिती

कोल्हापुरात शनिवारी कार्यक्रम : कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आसाम-मेघालयप्रमाणे तोडगा काढण्यात यावा, मराठी भाषिकांच्या हक्कांचे पालन व्हावे, यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सूचना करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती शनिवारी (दि. २०) कोल्हापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. त्यामुळे, अधिकाधिक कार्यकर्त्यांनी कोल्हापूरला यावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आले.

मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १७) मराठा मंदिर सभागृहाच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या भेटीसंदर्भात चर्चा झाली. मंत्री शहा १९ आणि २० जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. २० जून रोजी ते पोलिस परेड मैदानात जाहीर सभा घेणार आहेत. या सभेला सीमावासीयांनी उपस्थित राहावे. दरम्यानच्या काळात मंत्री शहा यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. त्याबाबत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिसप्रमुखांसह आमदार, खासदार आणि मंत्र्यांना निवेदन दिले आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आसाम-मेघालय सीमावादाप्रमाणे न्यायालयाच्या बाहेर तोडगा काढण्यात यावा, ही भेटीची प्रमुख मागणी असणार आहे. २०२२ मध्ये मंत्री शहा यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांची संयुक्त बैठक घेतली होती. सीमाभागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, सर्वोच्च न्यायालयातील दाव्याचा निकाल लागेपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवावी, दोन्ही राज्यांच्या प्रत्येकी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करावी, सीमाभागातील घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी केंद्राकडून आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असा निर्णय झाला होता; पण आदेशाची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे, यावर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना सूचना कराव्यात, अशी मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

कोल्हापूरमधील जाहीर सभेसाठी सीमावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आलेे. यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, रणजित चव्हाण-पाटील, ॲड. एम. जी. पाटील, ॲड. अमर यळ्ळूरकर, लक्ष्मण होनगेकर, आबासाहेब दळवी यांच्यासह इतर कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा

मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीचे सदस्य व ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी फोनवरून संपर्क साधून सीमाप्रश्नी सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा केली. उच्चाधिकार समिती बैठक, सीमाप्रश्नी दाव्यावर सुनावणी, याबाबत त्यांनी काही सूचना केल्या असून त्यानुसार पुढील रणनीती आखण्यात येणार आहे, असे अध्यक्ष मरगाळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT