केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Pudhari
बेळगाव

Maharashtra Karnataka border issue | म. ए. समिती भेटणार अमित शहांना

कोल्हापूर दौऱ्यात भेटीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली वेळ

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकीकरण समिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार आहे. केंद्रीय गृहमंत्री शहा १९ आणि २० जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर असून यावेळी समिती नेत्यांशी भेट घडवून आणावी, अशी मागणी सोमवारी (दि. १५) मध्यवर्ती समितीच्या शिष्टमंडळाने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कोल्हापूर दौऱ्यावर येणार असलेले केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घडवून आणावी, यासाठी आज मध्यवर्ती समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिसप्रमुखांची भेट घेतली. त्यांना भेटीसंदर्भात निवेदन सादर केले आहे. त्यामुळे, आगामी दौऱ्यात केंद्रीय मंत्री शहा समिती नेत्यांना भेट देतात का, हे पाहावे लागणार आहे. यावेळी एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, श्रीकांत कदम, राजू पाटील, आशिष कोचेरी, उमेश पाटील, संतोष कृष्णाचे उपस्थित होते.

अमित शहा यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी चार वर्षांपूर्वी महत्वाची भूमिका घेतली होती. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकाचे तत्कालीन मुख्यमंत्री, गृहमंत्री यांची संयुक्त बैठक घेऊन या प्रश्नी कुणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, त्यासाठी दोन्ही राज्यातील प्रत्येकी तीन मंत्र्यांची संयुक्त समिती स्थापन करावी. त्यांची बैठक घेऊन अहवाल सादर करावा. सीमाभागावर देखरेख करण्यासाठी केंद्राचा अधिकारी नेमावा, असा आदेश पारित केला होता. दरम्यान दोन्ही राज्यातील निवडणुकानंतर ही समितीही स्थापन झाली नाही आणि अधिकारीही नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे, या प्रश्नावर शहा यांनी पुन्हा लक्ष घालावे, यासाठी ही भेट महत्त्‍वाची ठरणार आहे.

मनोज जरांगे यांची भेट

कोल्हापूरमध्ये सोमवारी म. ए. समिती नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. मनोज जरांगे कोल्हापुरात खासदार शाहू छत्रपती यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यांनी समिती नेत्यांनी सीमाप्रश्नी आपण लक्ष घालू, अशी ग्वाही दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT