बेळगाव ः उद्यमबागमधील वेगा हेल्मेटच्या थकीत घरपट्टीप्रकरणाची लोकायुक्त चौकशीचा निर्णय शनिवारी (दि. 3) झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. खासगी मालमत्तेबाबतचा हा आतापर्यंतचा मोठा निर्णय असून यामध्ये अधिकार्यांवरही टांगती तलवार असणार आहे.
वेगा हेल्मेट घरपट्टी थकीत राहण्याच्या प्रकरणाशी संबंधित बिल कलेक्टरपासून महसूल उपायुक्तांपर्यंतच्या सर्व अधिकार्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी सत्ताधारी गटाकडून करण्यात आली होती. त्यामुळे, महापौर मंगेश पवार यांनी वेगा हेल्मेट घरपट्टीप्रकरण लोकायुक्तांकडे वर्ग करण्याचा ठराव संमत केला.
महापालिकेकडून घेतलेल्या परवानगीव्यतिरिक्त काही जागेत बांधकाम करण्यात आले आहे. त्याचबरोबर दोन पीआयडी क्रमांक देण्यात आले असून घरपट्टी वसुलीत तफावत आहे. तसेच संबंधित कंपनीकडून महापालिकेला कमी घरपट्टी भरली जाते. दरवर्षी एक लाखाहून अधिक घरपट्टी भरली जात होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्याकडून महापालिकेला घरपट्टी स्वरुपात अधिक रक्कम भरणे गरजेचे आहे. घरपट्टी वसुली करण्यात व भरण्यात महापालिकेच्या महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचार्यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे, महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी वेगा हेल्मेटच्या बांधकामाचे फेरमोजमाप करण्याचा आदेश बजावला होता.
सत्ताधारी गटाने सदर प्रकरण अधिक चौकशीसाठी लोकायुक्तांकडे सोपविले जावे, अशी मागणी केली होती. अधिकार्यांनी फेरमोजमाप केले असता वाढीव बांधकाम करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, या प्रकरणाची सुनावणी महापालिका आयुक्तांच्या न्यालयात सुरु होती.
सुनावणीवेळी वेगा हेल्मेट व्यवस्थापनाचे म्हणणे ऐकून घेत आयुक्तांनी वेगा हेल्मेटला 7 कोटी रुपयांचे चलन देऊन महापालिकेला सदर रक्कम भरण्याचा निर्णय दिला आहे. आता या थकीत घरपट्टी प्रकरणाची चौकशी लोकायुक्तांकडे जाणार असल्यामुळे सर्वांचे धाबे दणाणले आहेत.