चिकोडी : येथील कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयावर लोकायुक्त अधिकार्यांनी छापा टाकून 12 हजार रुपये लाच स्वीकारणार्या महिला अधिकारी व एका कर्मचार्याला रंगेहाथ पकडले. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी शोभा पोळ व कॉम्प्युटर ऑपरेटर प्रवीण दोडमणी अशी त्यांची नावे आहेत.
याबद्दल अधिक माहिती अशी, पेट्रोल पंपला एनओसी देण्यासाठी 12 हजार रुपये देण्याची मागणी या अधिकार्यांनी केली होती. याविषयी लोकायुक्त अधिकार्यांकडे केलेल्या तक्रारीनुसार अधिकार्यांनी कार्यालयावर छापा टाकून पैसे स्वीकारत असताना ही कारवाई केली. लाच घेत असताना प्रदूषण नियंत्रण अधिकारी शोभा पोळ व कॉम्प्युटर ऑपरेटर प्रवीण दोडमणी यांना लोकायुक्त पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या दोघांनी सागर दोडमणी यांच्याकडे लाच मागितली होती. याविषयी सागर दोडमणी यांनी लोकायुक्त कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानंतर लोकायुक्त पथकाने सदर कारवाई केली. या कारवाईत लोकायुक्त डीवायएसपी बी. एस. पाटील व इन्स्पेक्टर एस. एच. होसमनी यांच्या नेतृत्वाखाली इतर कर्मचारी सहभागी झाले होते.