कोगनोळी 'आरटीओ'वर लोकायुक्तांची धाड File Photo
बेळगाव

कोगनोळी 'आरटीओ'वर लोकायुक्तांची धाड

पुढारी वृत्तसेवा

कोगनोळी : पुढारी वृत्तसेवा

कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणाऱ्या व महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी कोगनोळीनजीक राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत असलेल्या आरटीओ कार्यालयावर आज (मंगळवार) पहाटे लोकायुक्तांनी धाड टाकली. लोकायुक्तांनी कागदपत्रांसह तब्बल ६ तासांपेक्षा अधिक वेळ तपासणी केली. तपासणी काळात अनेक वाहने तपासणी न करताच सुसाट जात असल्याचे दिसून येत होते.

वाहन चालक व मालकांकडून लूट होत असून, कोगनोळी आरटीओ कार्यालयातून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांतर्फे 8 रोजी पहाटे धाड टाकण्यात आली. अचानक लोकायुक्तांच्या धाडीमुळे या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

याबाबत बोलताना लोकायुक्त पोलिस अधिक्षक हनुमंतराय यांनी कोगनोळी आरटीओ कार्यालयात कागदपत्रांची तपासणी सुरू असून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून योग्य कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

पोलिस अधिक्षक हनुमंतराय यांच्यासमवेत सुमारे 15 लोकायुक्त कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन कागदपत्रांसह अन्य कामकाजाची तपासणी केली. पहाटेच्या वेळी चार वाहनांमधून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी अचानकपणे धाड टाकली. यावेळी अनेक ट्रक चालक व मालक आपल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी कार्यालयात उपस्थित होते. धाड पडताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी ट्रक चालकांना व मालकांना खुणावून बाहेरच्या बाहेर पाठवून देण्यात आले. कोगनोळीनजीक असणारा आरटीओ नाका हा नेहमीच चर्चेत राहिला आहे.

या ठिकाणी अनेकदा लोकायुक्तांच्या धाडी पडल्या असून आर्थिकदृष्ट्या मोठे घबाड सापडल्याची उदाहरणे आहेत. यावेळी रोख स्वरूपात किती रक्कम सापडली. याबाबत अधिकाऱ्यांनी खुलासा देण्यास नकार देऊन बेळगावला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर खुलासा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

नाकापेक्षा मोती जड

कोगनोळी तपासणी नाक्यावर होमगार्ड म्हणून कार्यरत असणारे काही कर्मचारी हे ट्रकचालक व मालकांवर अरेरावीची भाषा करताना दिसून येत होते. त्यामुळे त्रस्त झालेल्या ट्रकचालक व मालकांनी याबाबत लोकायुक्तांकडे तक्रार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांपेक्षा या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची अरेरावी अधिक असल्याचे समजते. सदर कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ट्रकचालक व मालकांतून होत आहे.

आरटीओ कार्यालयाजवळ शुकशुकाट

कोगनोळी आरटीओ तपासणी नाक्यावर अचानक पडलेल्या धाडीमुळे महाराष्ट्रातून येणारे वाहनचालक व कर्नाटकातून महाराष्ट्राकडे जाणारे वाहनचालक कागदपत्रांची तपासणी न करता सुसाट जाताना दिसत होते. त्यामुळे संपूर्ण आरटीओ कार्यालय परिसरामध्ये शुकशुकाट दिसून येत होता. एरव्ही हातामध्ये फायली घेऊन अर्थपूर्ण व्यवहाराची कागदपत्रे घेत धावपळ करणारे ट्रकचालक न थांबताच सुसाट जाताना दिसून आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT