बेळगाव : टिळकवाडी, पहिला रेल्वे गेट येथे शनिवारी दुपारी एक पुरुष जीवन संपवण्यासाठी प्रयत्न करत होता. हे कृत्य घटनास्थळापासून जवळच असलेल्या येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्या दृष्टीस पडले. त्यांनी लागलीच टिळकवाडी पोलीस स्टेशनला धाव घेऊन तेथील एका कॉन्स्टेबलला सोबत घेत घटनास्थळ गाठले.
यानंतर या दोघांनी लागलीच धावाधाव करून त्या पुरुषाला रेल्वे ट्रॅक पासून दूर नेवून जीवन संपवण्यापासून परावृत्त केले. यादरम्यान काही क्षणातच ट्रॅक वर ट्रेन आली. रेल्वे ट्रॅक वर हा थरार सुरू होता. हा क्षण खूप घाई गडबडीचा आणि मोठ्या धाडसाचा होता. सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी या घटनेत लक्ष घालून मोठा अनर्थ टाळला. या दोघांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल त्या पोलीस कॉन्स्टेबलसह फेसबुक फ्रेंड सर्कलचे व सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांचे परिसरात कौतुक होत आहे.