Jayant Patil : सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांना सोमवारी भेटणार Pudhari
बेळगाव

Jayant Patil : सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांना सोमवारी भेटणार

आमदार जयंत पाटील : समिती नेत्यांनी केली अन्यायावर वाचा फोडण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : सीमाभागात जय महाराष्ट्र म्हटले, महाराष्ट्र गीत गायिले तरी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आमची बाजू मांडणारा एकही नेता महाराष्ट्रात नाही. त्यामुळे आपणच ही जबाबदारी स्वीकारावी. आमच्यावरील अन्यायाविरोधात वाचा फोडावी, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी माजी मंत्री विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्याकडे केली. त्यावर आमदार पाटील यांनी सोमवारी (दि. 23) आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करतो. त्यानंतर सीमाभागातील शिष्टमंडळाची भेट घडवून आणतो, अशी ग्वाही दिली.

आमदार जयंत पाटील यांनी शुक्रवारी (दि. 20) दीपक दळवी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर म. ए. समितीच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी प्रकाश मरगाळे यांनी आमच्यावर अन्याय होत असतानाही महाराष्ट्राकडून काहीही प्रतिक्रिया उमटत नाहीत. त्यामुळे आपणच सीमावासीयांना न्याय द्यावा, लढ्यात पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली. सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी, महाराष्ट्र सरकारने सीमा समन्वय मंत्री नेमले आहेत. पण त्यापैकी एकही मंत्री आतापर्यंत बेळगावात आलेला नाही. त्यांनी बेळगावकरांची विचारपूस केली नाही. चार वर्षांत कर्नाटकी सरकारकडून मराठी भाषिकांवर दडपशाही करण्यात येत आहे. त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे, असे सांगितले.

कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर यांनी, सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील कामकाज गतीने होणे आवश्यक आहे. आमच्या अनेक पिढ्या या लढ्यात वाया जात आहेत. कर्नाटक सरकार जाहीर सभांत महाजन अहवाल अंतिम असल्याचे सांगत आहे. पण तसा कोणताही पुरावा सर्वोच्च न्यायालयात दिलेला नाही किंवा विधिमंडळातही ठराव केलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी महाराष्ट्राने आक्रमक व्हावे, अशी अपेक्षा आहे, असे सांगितले.

युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी, जय महाराष्ट्र म्हटले, महाराष्ट्र गीत गायिले तर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. तडीपारीची नोटीस देण्यात येत आहे. याविरोधात महाराष्ट्र सरकारकडून आवाज उठवणे आवश्यक आहे, असे सांगितले. रणजित चव्हाण-पाटील यांनीही सीमावासीयांकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा मांडला. यावेळी आमदार पाटील यांनी सीमाप्रश्नी सोमवारी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यामध्ये सर्व मुद्दे उपस्थित करण्यात येतील. त्यानंतर काही दिवसांत म. ए. समितीच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणण्यात येईल. विधीमंडळ अधिवेशनात राज्यपालांच्य भाषणावर बोलताना सीमाप्रश्नाचा मुद्दा उपस्थित केला होता. आता याप्रकरणी पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर, अमित देसाई, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, दत्ता उघाडे, धनंजय पाटील, श्रीकांत कदम, चंद्रकांत कोंडुस्कर, दत्ता उघाडे, माजी नगरसेवक विजय पाटील, किरण हुद्दार, नारायण मुचंडीकर आदी उपस्थित होते.

एकदा सोक्षमोक्ष लावा

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यात यावा. अनेक पिढ्यांचा हा लढा आहे. त्याकडे आता महाराष्ट्र सरकार दुर्लक्ष करत असेल तर आम्ही नेमके कोणत्या राज्याचे आहोत, हे एकदाचे निश्चित करावे, लढा देणाऱ्या लोकांना कर्नाटक टार्गेट करत आहे आणि त्याकडे महाराष्ट्र डोळेझाक करत आहे, त्यामुळे आता प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी विनंती मध्यवर्ती समिती कार्याध्यक्ष, माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT