Land Grabbing Pudhari
बेळगाव

Belgaum land grab case: बोगस कागदपत्रांद्वारे जमीन हडप

सब-रजिस्ट्रारसह 10 जणांवर गुन्हा; दोन महिलांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : मूळ मालकाने कब्जा सोडल्याची बनावट कागदपत्रे तयार करून सुमारे 2 कोटी रुपयांची शेतजमीन परस्पर हडप केल्याचा प्रकार कुरणी (ता. हुक्केरी) येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल केला असून, यामध्ये हुक्केरी उपनोंदणी अधिकाऱ्यासह बॉण्ड रायटरचा समावेश आहे. या दोघांवर काही दिवसांपूर्वी कुरणीवाडी येथील शेती प्रकरणातही गुन्हा दाखल झाला आहे.

उपनोंदणी अधिकारी मडीवाळय्या बसवराज बानीमठ, फोटो स्टुडिओ चालक अशोक रत्नाप्पा सूर्यवंशी, रेणुका शंकर माळी, शिवरूद्र प्रधानी कुदनुरी, काशव्वा शिवरूद्र कुदनुरी, नीलकंठ शेट्याप्पा मुदपाकी, मृत अडिवेप्पा शेट्याप्पा मुदपाकी, सिद्धय्या निरूपादय्या हिरेमठ, विजय मठद (सर्वजण रा. कुरणी), आनंद एम. दड्डीमणी अशी संशयितांची नावे आहेत.

जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कुरणी येथे शिवानंद मारुती कुदनुरी यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. उपरोक्त संशयितांपैकी ज्यांनी त्यांची जमीन नावावर करून घेतली, त्यापैकी कोणीही भाऊबंदकीतील नाही. तरीही या सर्वांनी संगनमत करून मूळ मालक व त्यांच्या भावांनी शेतजमिनीचा कब्जा सोडला आहे, असे दाखवणारी बनावट कागदपत्रे तयार केली. मूळ मालक असल्याचे दाखवत तशी बनावट कागदपत्रे बनवत आपली नावेदेखील उताऱ्यावर लावून घेतली.

नीलकंठ मुदपाकी मास्टरमाईंड

फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला, तेव्हा मूळ मालक शिवानंद यांनी यमकनमर्डी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. नीलकंठ मुदपाकी हा मास्टरमाईंड असल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. कारण, त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला असता, नऊ बनावट आधार कार्डे, तीन पॅन कार्ड, एक मतदान ओळखपत्र अशी 13 बनावट ओळखपत्रे व अन्य 9 बनावट कागदपत्रे सापडली आहेत.

आणखी एक संशयित अशोक सूर्यवंशी याचा फोटो स्टुडिओ असून पोलिसांनी स्टुडिओवरही छापा टाकला. तिथे बनावट कागदपत्रे तयार केली जात होती. कॉम्प्युटर, लॅपटॉप, कॅमेरा, दोन प्रिंटर व एक लॅमिनेशन मशिन जप्त केले आहे. त्याला व विजय मठद या दोघांना 28 जानेवारी रोजीच अटक झाली आहे.

एक मृत, बाकीच्यांना अटक

मृत वगळता उर्वरित संशयितांना नुकतीच अटक झाली असून त्यांची कारागृहात रवानगी केली. या प्रकरणातील उपनोंदणी अधिकारी व बॉण्ड रायटरला यापूर्वीच अटक झाली आहे. हे दोघेजण जामिनावर बाहेर आले असून त्यांनी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात हजेरी लावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT