बेळगाव : केवायसीमुळे अंगठ्याचा ठसा लावून रेशन घेणे बंधनकारक आहे. सहा महिने रेशन न घेतलेल्या कुटुंबांच्या रेशनकार्डला स्थगिती देण्यात आली आहे. रेशनकार्ड बंद झाल्यास ग्रामीण भागातील रेशनकार्डधारकांनी तहसील कार्यालय व शहरातील रेशनकार्डधारकांनी कोर्ट आवारातील अन्न व नागरी पुरवठा खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नायक यांनी केले आहे.
थेट लाभधारकांना लाभ मिळावा या उद्देशाने बायोमेट्रीक पद्धतीने रेशन वितरण केले जात आहे. रेशनकार्ड कुटुंबप्रमुखाच्या खात्यात यापूर्वी दरमहा माणसी 170 रुपये प्रमाणे तांदळाचे पैसे जमा होत होते. महिलांना दोन हजार मिळत असल्याने बंद असलेले रेेशनकार्ड सुरु करण्यासाठी रेेशनकार्डधारकअन्न व नागरी पुरवठा खात्यात चकरा मारत आहेत. रेशन घेण्यापूर्वी केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्यांना रेशन दुकानात जाऊन केवायसी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी रेशनकार्डवर जेवढे सदस्य आहेत त्यांची उपस्थिती व अंगठ्याचा ठसा जुळणे आवश्यक आहे. तरच बंद पडलेले रेशनकार्ड पुन्हा सुरु होत आहे.
रेशनकार्ड, आधारकार्ड व बँक खात्याचे नाव जुळणे आवश्यक आहे. तरच रेशन वितरण होत आहे. यापूर्वी सुरु असलेली मोबाईलवरील ओटीपी सेवा बंद झाली असून रेशन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी बायोमेट्रीक पद्धतीनेच रेशन वितरण होत आहे, असे त्यांनी सांगितले.