बंगळूर : कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीमधील घोटाळ्याबद्दल मंगळवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) केपीएससीचे माजी अध्यक्ष शिवशंकराप्पा साहुकार यांच्या घरासह राज्यभरात २१ ठिकाणी छापे घातले. त्यात बेळगाव जिल्ह्यातील कित्तूरचाही समावेश आहे. घोटाळ्याचे धागेदोरे बेळगाव जिल्ह्यात येऊन पोहोचले आहेत.
घटप्रभा येथील एकावर संशय असल्याने त्याच्यावर तसेच कित्तूर येथील त्या संशयिताच्या मामाच्या घरावरही मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. दुसरीकडे भरती घोटाळ्यामुळे अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेल्या शिवशंकराप्पांना ७ दिवसांच्या आत केपीएससी अध्यक्षपदी पुनर्स्थापित करण्याचे निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी भरती परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. याचाच भाग म्हणून मंगळवारी ईडीने राज्यभरात ठिकठिकाणी छापे टाकले. याचे धागेदोरे बेळगावपर्यंत असल्याचे समजल्यावरून कित्तूर येथेही छापा पडला.
कित्तूरमधील सदाशिवनगर येथे कुबेर जायकन्नवर यांचे घर आहे. मंगळवारी सकाळी अचानक त्यांच्या घरासमोर सरकारी अधिकाऱ्यांची वाहने जाऊन थांबली. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घरातील कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. कुबेर जायकन्नवर यांचा या घोटाळ्याशी थेट संबंध नसला, तरी त्यांची बहीण घटप्रभा येथे राहते. त्यांचा भाचा अभिषेक महादेव देवलापूर याचा या घोटाळ्याशी संबंध असल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे मंगळवारी त्यांनी गोकाक तालुक्यातील घटप्रभा येथे अभिषेक याच्या घरावर छापा टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली. या तपासावेळी अभिषेकचे पालक कित्तूरला गेल्याचे समजले.
कित्तूर येथे कुठे गेले आहेत, याची माहिती घेतली असता, कुबेर हा अभिषेकचा मामा असल्याचे समजले. या माहितीवरून तेथेही छापा टाकला. तपासावेळी दोन्ही ठिकाणी स्थानिक पोलिस व सीआरपीएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. या तपासात नेमके काय सापडले, याची माहिती मिळू शकलेली नाही.
नेमका घोटाळा काय?
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती गुणवत्ता यादीनुसार झालेली नाही, असा आरोप झाल्यानंतर ईडीने बंगळूर व बेळगावसह राज्यातील २१ ठिकाणी छापे टाकून पैसे व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त केले आहेत. तसेच या घोटाळ्याचा सूत्रधार मानल्या जाणाऱ्या शिवशंकराप्पा साहूकर यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशीही सुरू केली आहे.
बंगळूर विभागाच्या ईडी अधिकाऱ्यांनी पहाटेच्या सुमारास बेळगाव, बंगळूर, हसन, चित्रदुर्ग, दावणगिरी, रायचूर, कारवार, गुलबर्गा व अहमदाबादसह अनेक ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. ईडी अधिकाऱ्यांनी शिवशंकराप्पा यांच्यासह केपीएससी सदस्य शांता होसमनी यांच्यासह उत्तरपत्रिकांच्या डिजिटल मूल्यांकनाची जबाबदारी असलेली ‘एड्युटेस्ट सोल्युशन्स’ कंपनी व निवड झालेल्या पशुवैद्यकीय अधिकारी उमेदवारांच्या घरांवर छापे टाकले.
बंगळूरमध्ये शिवशंकराप्पांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांच्या पत्नीसह कुटुंबीयांकडे चौकशी केली. काही कागदपत्रे जप्त केली. शिवाय पुढील चौकशीसाठी शिवशंकराप्पा यांना ताब्यात घेतले आहे. शिवशंकराप्पांच्या मित्रांच्या घरांवर व कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले आहेत. त्यांनी बेकायदेशीरपणे मिळवलेले पैसे हस्तांतरित केल्याच्या संशयावरून ईडीच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी ही कारवाई केली. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या मुख्यालयावरही छापा टाकण्यात आला असून, माहिती गोळा केली जात आहे.