बेळगाव : कोल्हापूर जिल्ह्यातून बेळगावाला एका लग्न समारंभाला आलेल्या महिलेची दागिन्यांची बॅग अनावधानाने सीबीटीतच राहिली. खानापुरात गेल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. परंतु, येथे गस्तीवर असलेल्या पोलिसांना ही बॅग मिळाल्यानंतर त्यांनी सदर महिलेला बोलावून घेत त्यांच्याकडे सुपूर्द केली. यामध्ये १ लाख ८२ हजारांचे दागिने होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, सुप्रिया संजय वीर (वय ४४, रा. सोपानदेव गल्ली, शांतीनगर, पाचगाव, जि. कोल्हापूर) खानापूरमध्ये या लग्नाला जाण्यासाठी शुक्रवारी सकाळी बसने कोल्हापूरहून बेळगावला आल्या. सीबीटीत उतरल्यानंतर त्यांनी पुन्हा खानापूरला जाण्यासाठी बस पकडली. परंतु, या घाईत त्या एक बॅग सीबीटीमध्येच विसरल्या. ही बाब त्यांना खानापूरला जाईपर्यंत लक्षात आली नाही.
परंतु, जेव्हा लक्षात आली तेव्हा त्यांना धक्का बसला. त्या तातडीने पुन्हा बेळगावला आल्या. ही माहिती त्यांनी मार्केट पोलिस ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांना दिली. त्यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन तसेच सीबीटीमध्ये गस्तीवर असलेल्या पोलिसांना सूचना देऊन बॅगेचा शोध सुरु केला. सुदैवाने ही बॅग त्यांना सापडली. ही बॅग शोधण्यासाठी निरीक्षक कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हुसेनसाब केरुर, कॉन्स्टेबल एस. बी. मडीवाळर यांनी प्रयत्न केले.
बॅगेत ५ ग्रॅमची सोनसाखळी, ७ ग्रॅमची कर्णफुले व सोनसाखळी, नऊ तोळ्यांचे चांदीचे दागिने एक ग्रॅम सोन्याच्या मुलामा दिलेला नेकलेस व चार हजार रुपयांची रोख रक्कम होती. हा सर्व मुद्देमाल १ लाख ८२ हजाराचा असून तो जसाच्या तसा सदर महिलेकडे सुपूर्द केला. पोलिसांनी दाखवलेली तत्परता व त्यांच्यामुळे दागिने मिळाल्याने सदर महिलेने समाधान व्यक्त केले.