बेळगाव : ऐन दिवाळीत म. ए. समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना तुरुंगात पाठवण्याचे पोलिसांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. जुन्या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी शुभम यांना अटक केली. मात्र, समितीच्या कायदा सल्लागारांनी तातडीने हालचाली करत जामीन मिळवल्याने पोलिसांचा रडीचा डाव उधळला गेला. मात्र, या प्रकारामुळे पोलिस मराठी जनतेच्या विरोधात खुन्नस ठेवून वागत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कर्नाटक रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा याला प्रत्युत्तर दिल्याप्रकरणी अटक करून तुरुंगात पाठवता येत नाही, हे ताडलेल्या पोलिसांनी शेळके यांना शनिवारी दुसर्या एका प्रकरणात अटक केली. खडेबाजार ठाण्यातील एका जुन्या प्रकरणात न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्याचा दाखला देत ही कारवाई करण्यात आली. रविवार तसेच दिवाळीच्या सुटी काळात शेळके कारागृहात जावेत, यासाठी पोलिसांनी व्यवस्थित व्यूहरचना केली होती. परंतु, तिसर्या जेएमएफसी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याने पोलिसांचे त्यांना कारागृहात पाठवण्याचे स्वप्न धुळीला मिळाले.