बंगळूर : कट्टर विरोधक व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन राज्यात खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे आमदार के. एन. राजण्णा यांनी आता लेटर बॉम्ब टाकला आहे. त्यांनी काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना एक पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितली आहे. आपल्या आठ पानांच्या पत्रात राज्य काँग्रेसमधील अलीकडच्या काळातील घडामोडी व लोकसभा निवडणुकीवेळी घडलेल्या अनेक घटनांचा उल्लेख केला आहे. या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
पत्रात असे म्हटले आहे की, मी तुमकूर जिल्ह्यातील मधुगिरी मतदारसंघाचा आमदार असून, यापूर्वी राज्य सरकारमध्ये सहकारमंत्री व हासनचा पालकमंत्री म्हणून काम केले आहे. मात्र, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यावर काही महत्त्वाच्या बाबी पक्षाच्या निदर्शनास आणून देणार आहे. तसेच, मतदानातील गैरप्रकारांविरुद्धच्या तुमच्या लढ्याचे मी मनापासून समर्थन करतो. देशासमोर असे महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात तुमच्या नेतृत्वाचे व पुढाकाराचे मी मनापासून कौतुक करतो. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. लोकसभा निवडणुकीत केपीसीसीने नियुक्त केलेल्या बीएलएनी त्यांच्या जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडल्या नाहीत. केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार व संबंधितांकडेही मी हे स्पष्ट केले आहे. ते टाळता आले असते. तर काँग्रेसला कर्नाटकात 8 ते 10 जागा जास्त मिळाल्या असत्या. इतर राज्यांमध्ये अशाच प्रकारच्या चुका टाळल्या असत्या, तर लोकसभेत 30 ते 40 जागा जास्त मिळाल्या असत्या. त्या परिस्थितीत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नसते. काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत आला असता व आमचे नेते राहुल गांधी पंतप्रधान झाले असते, असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.
सत्य मांडण्यासाठी पत्र
माजी मंत्री राजण्णा यांनी पत्रात त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल काँग्रेस पक्षावरील निष्ठेबद्दल व मंत्री म्हणून केलेल्या कामाबद्दल, त्यांच्या राजकीय कामगिरीबद्दल उल्लेख केला आहे. सत्य मांडण्यासाठी हे पत्र लिहिले असून, माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावला गेला असल्याचे तुमच्या लक्षात आणून दिले. या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ देण्याची विनंती त्यांनी केली आहे.