Crime News  pudhari
बेळगाव

Illegal mineral transport: किणयेत बेकायदा खनिज वाहतूक

आठ जणांवर गुन्हा : सरकारची 20 लाखांची रॉयल्टी बुडवल्याचा ठपका

पुढारी वृत्तसेवा

बेळगाव : तालुक्यातील किणये येथे बेकायदेशीर खनिज वाहतूक केल्याने आठ जणांविरोधात वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या संशयितांनी दोन सर्व्हे क्रमांकातून बेकायदेशीर लाल माती उपसा करून शासनाचे 20 लाख 25 हजारचे नुकसान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. खाण व भूगर्भ उपसंचालक खात्याच्या बिंदन पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या संशयितांमध्ये भरमाण्णा मारुती पाटील, जोमगौडा मारुती पाटील, प्रल्हाद महादेव पाटील, सुभाष नारायण गावडा, नारायण भरमाण्णा पाटील, संजय यशवंत पाटील, वीर पाटील व अक्षय पाटील (सर्वजण रा. किणये, ता. बेळगाव) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपरोक्त सर्व संशयित सरकारी कार्यालयातून कोणतीही परवानगी न घेता पहिले दोघे संशयित सर्व्हे क्रमांक 183/2 मधील शेतजमिनीतून सुमारे 5 हजार 625 मे. टन इतके खनिज वाहतूक केल्याचे आढळून आले. ही बेकायदेशीर वाहतूक करत त्यांनी सरकारचा 11 लाख 25 हजार रूपयांचा महसूल बुडवला आहे.

उर्वरित सहा जणांनी सव्हे क्रमांक 184/1 मधील शेतजमिनीतून 4 हजार 500 मे. टन खनिज वाहतूक करत 9 लाखांचा महसूल बुडवला आहे. सर्व संशयितांनी तब्बल 20 लाख 25 हजार रूपयांची रॉयल्टी सरकारला न भरता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनास्थळी श्रीमती बिंदन पाटील, वडगावचे उपनिरीक्षक संतोष दळवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यामध्ये तथ्य आढळल्यानंतर वडगाव पोलिसांनी याची नोंद करून घेतली. निरीक्षक नागनगौडर कट्टीमणीगौडर तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT