बेळगाव

Belgaum waterfall ban : खानापूर तालुक्यातील नऊ धबधब्यांवर प्रवेश बंदी

सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना ; नियमांचे उल्लंघन केल्यास वनविभागाचा कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

वासुदेव चौगुले

खानापूर : वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील विविध वनक्षेत्रांमध्ये असलेल्या 9 धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पारवाड, चिगुळे, मान, डेल्टा येथील धबधब्यांवर शनिवारपासून वन कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

नुकताच गोव्याच्या हद्दीत सलग दोन घटनांमध्ये दोन पर्यटक तरुणांना धबधब्यात पडून जीवाला मुकावे लागले आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर खानापूर तालुक्यातील धबधब्यांच्या ठिकाणी देखील अदृश्य धोके असल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उपवनसंरक्षक क्रांती यांनी याबाबत स्पष्ट निर्देश देताना धबधब्यांच्या ठिकाणी निसरड्या वाटांवर धोकादायक परिस्थिती उद्भवू शकते.

पाण्याचा प्रवाह कधीही वाढू शकतो. या धोक्यांचा आगाऊ अंदाज येणे कठीण असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खानापूर तालुक्यातील मान, सडा, चोर्ला, चिखले, चिगुळे, पारवाड, बेटणे, डेल्टा, भटवाडा या धबधब्यांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसह मानवी जीविताचे संरक्षण हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. पावसाळ्याच्या काळात धबधब्यांच्या जलाशयांमधील पाण्याची पातळी अचानक वाढणे, खोल खड्डे, वेगवान प्रवाह तसेच वन्य प्राण्यांचा वावर यामुळे अपघात होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे नागरिकांनी अशा ठिकाणी जाणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

वन विभागाने नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना देखील जारी केल्या आहेत. वनक्षेत्रातील प्रतिबंधित धबधब्यांच्या ठिकाणी विनाकारण प्रवेश करणे, पोहणे किंवा धोकादायक कृत्ये करणे टाळावे. तसेच वनक्षेत्रात परवानगीशिवाय प्रवेश करून कोणत्याही प्रकारचा उपद्रव करू नये, असे आवाहन केले आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वन कायद्यांनुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

बेळगाव उपवनसंरक्षकांच्या आदेशानुसार सर्व नऊ धबधब्यांच्या ठिकाणांवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राखीव वनक्षेत्रात धबधबे असल्याने तेथे प्रवेशास पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. विनापरवाना प्रवेश केल्याचे आढळून आल्यास कर्नाटक वन कायदा 1963 आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी सहकार्य करून वन्यजीव संरक्षण आणि स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
बसवराज वाळद (एसीएफ खानापूर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT