खानापूर : पीटी शीट नकाशा तयार करून देण्यासाठी शेतकर्याकडून 4,500 रुपयांची लाच घेताना येथील सर्व्हे विभागातील भूमापकाला लोकायुक्तांनी रंगेहाथ पकडले. विनोद संबाणी असे त्याचे नाव असून, या कारवाईने तहसीलमधील भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहेत.
मन्सापूरमधील (ता. खानापूर) शेतकरी सदाशिव कांबळे यांच्याकडून संबाणी यांनी पीटी शीट तयार करून देण्यासाठी 4,500 रुपयाची लाच मागितली होती. याबाबत कांबळे यांनी बेळगाव लोकायुक्त पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लोकायुक्त एसपी हणमंतराय यांच्या मार्गदर्शनाखाली डीएसपी भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा रचला. दुपारी 12 च्या सुमारास संबाणी यांनी शहरातील पारिश्वाड रस्त्यावरील आपल्या घराकडे पैसे देण्यासाठी कांबळे यांना बोलविले होते. त्याच ठिकाणी सापळा रचून लोकायुक्त पथकाने त्याला पैसे घेताना रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक संगमेश होसमनी, रविकुमार धर्मट्टी यांनी ही कारवाई केली.
दोन महिन्यांपूर्वी सर्वे विभागातील दोघा अधिकार्यांचे निलंबन करण्यात आले होते. सर्वे विभागात मोजणी तसेच नकाशा तयार करुन देण्यासाठी शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. या कारवाईने येथील गैरप्रकारांना आळा बसेल अशी आशा आहे.