खानापूर : ग्रामीण भागात घरफोडी आणि दागिन्यांच्या चोरीचे सत्र थांबलेले नसताना आता मंदिरेही सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील बुरुड गल्लीतील मेदार लक्ष्मी मंदिरात दरवाजाचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीवरील सुमारे चार लाख किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविण्यात आले. मंगळवारी (दि. 4) सकाळी पुजारी नेहमीप्रमाणे मंदिर उघडण्यासाठी गेल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला.
मुख्य दरवाजाला असलेले कुलूप कटरच्या साहाय्याने तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. देवीच्या मूर्तीवरील सोन्याची दोन मंगळसूत्रे, हार असे अडीच तोळ्याचे दागिने तसेच मुकुट, कमरपट्टा, पादुका, तोडे असे अर्धा किलो चांदीचे दागिने लंपास केले. भरवस्तीत हे मंदिर आहे. या रस्त्यावर रात्री एक-दोनपर्यंत लोकांची वर्दळ असते. मंदिराच्या दोन्ही बाजूला घरे आहेत. त्यामुळे दरवाजा उघडण्यापूर्वी कोणताही आवाज होणार नाही याची पुरेपूर दक्षता घेऊन कुलूप तोडण्यात आला.
पोलिस निरीक्षक एल. एच. गवंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बेळगावमधून श्नानपथक व ठसेतज्ज्ञांना बोलविण्यात आले. गल्लीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या चित्रणातून पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरु केले आहे.
मेदार लक्ष्मी मंदिर कमिटीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत मंदिर व दागिन्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन दिवसांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार होते. तत्पूर्वीच चोरट्यांनी डाव साधल्याने पोलिसांसमोर तपासाचे आव्हान आहे.