Belgaum Crime News 
बेळगाव

Belgaum Crime : 'पत्नीला मरेपर्यंत बदडलं', मग रचला 'हार्ट अटॅक'चा बनाव; सैतान नवऱ्याचा मास्टर प्लॅन 'असा' झाला उघड

चारित्र्यावर संशय, पती गजाआड

पुढारी वृत्तसेवा

खानापूर : कापोली (ता. खानापूर) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने बेदम मारहाण करून तिचा खून केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. खुनाचे कृत्य लपविण्यासाठी पत्नीचा हृदयाघाताने मृत्यू झाल्याचा बनाव पतीने केला; पण पत्नीच्या आई-वडिलांनी घेतलेल्या संशयामुळे त्याचा हा डाव फसला. किरण अविनाश बाळेकुंद्री (32, रा. कापोली, ता. खानापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. अविनाश मारुती बाळेकुंद्री (38) असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. नंदगड पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, किरण व अविनाश यांचे कापोली बसस्थानकाजवळ किराणा दुकान आहे. पती अविनाशचा प्रवासी गाड्यांचा व्यवसाय आहे. किरण दुकान चालवीत होती. दुकानातील गिऱ्हाईकांशी सतत फोनवरून बोलतेस असे म्हणून अविनाश पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातूनच रविवारी त्यांच्यात वाद झाला. किरण हिच्या आई-वडिलांनी येऊन त्यांचे भांडण मिटविले. सोमवारी रात्री बाराच्या सुमारास अविनाशने पुन्हा वाद घालत किरण हिला बेदम मारहाण केली.

लाटणे, काठी व लाथा-बुक्क्यांनी तिच्या डोके, पाठ व चेहऱ्यावर मारहाण केल्याने ती गंभीर जखमी झाली. बेशुद्ध अवस्थेत मंगळवारी सकाळी खानापूर येथील खासगी दवाखान्यात घेऊन गेला. तेथील डॉक्टरांनी किरण हिला मृत घोषित केले. खुनाच्या प्रकरणात आपण अडकणार या भीतीने अविनाशने पत्नीचा मृतदेह घरी नेऊन सगळ्यांना तिचा हृदयाघाताने मृत्यू झाल्याचे सांगितले.

तथापि, किरण हिच्या शरीरावरील जखमांमुळे संशय आल्याने नंदगड पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक रवीकुमार धर्मट्टी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता किरण हिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या. त्यावरून अविनाश याला ताब्यात घेण्यात आले. त्यांना नऊ वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी आहे. याप्रकरणी नंदगड पोलिसांत भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103 (1), (2) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT